रुचा वझे, झी मीडिया, मुंबई : दहा रुपयांच्या शिवथाळी योजनेचा आज मुंबईत शुभारंभ झाला. तीन कोटी लोकसंख्येच्या मुंबईत अवघ्या दहा हजार थाळी जेवण उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. त्यामुळं एवढ्या मोठ्या लोकसंख्येला दहा हजार थाळ्या कशा पुरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारने मोठा गाजावाजा करत १० रुपये थाळीची शिवभोजन योजना सुरु केली. पण ही योजना म्हणजे अळवावरचं पाणी ठरलंय. साधारण तीन कोटी लोकसंख्येच्या मुंबईत अवघी ७० केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या सत्तर केंद्रांमध्ये ७० ते दीडशे थाळ्या उपलब्ध असणार आहेत. म्हणजे जवळपास दहा हजार थाळ्या रोज सरकार देणार आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी तर ही योजना कॉर्पोरेटसाठीही सुरु करणार असल्याचं सांगितलं आहे.
आज मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृह येथे नागरिकांसाठी १० रुपयांत आहार असलेल्या 'शिवभोजन' या योजनेचे उद्घाटन केले.
पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. pic.twitter.com/PQVn7uweUa
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 26, 2020
तीन कोटी लोकसंख्येच्या मुंबई गरीब आणि गरजू लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या लोकांसाठी या दहा हजार थाळ्या कशा पुरणार?..त्यामुळं शिवभोजन केंद्रात थाळी संपली असा बोर्डच सामान्यांचं स्वागत करेल अशी शक्यता जास्त आहे. शिवाय जो थाळी विकत घेणार त्याचा फोटोही काढला जाणार आहे. त्यामुळं थाळी घेताना सामान्यांना अपमानास्पद वाटणार नाही का असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सरकार ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवत असलं तरी ही योजना व्यवहार्य वाटत नाही. दहा रुपयांच्या थाळीत किती गरिबांची पोटं भरतील हे माहिती नाही. पण सरकारचं तोंड पोळण्याची शक्यताच जास्त आहे. शिवथाळी योजना एक रुपयांतल्या झुणकाभाकरच्या मार्गानंच जाईल अशी शक्यता जास्त वाटते.