Maharashtra Political Crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या घडामोडींना वेग आलाय. त्यामुळे राज्यपाल लवकरच बहुमत चाचणीचा आदेश देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय. तर शिंदे गटाचे लोक अनुपस्थित राहिले तरी भाजपाकडे बहुमत असल्याचा दावा भाजपा नेते करतायत.
राज्यातील राजकारण आता शिगेला पोहोचलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरु झाला आहे. बंडखोर शिंदेविरोधात युवा सेना अध्यक्ष आणि मंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या भेटी गाठी आणि मेळावे सुरु केले आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी कर्जत इथल्या शिवसैनिकांशी संवाद साधत बंडखोर नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
माझ्या आजी आणि आजोबांचं आवडत कर्जत हे आवडतं ठिकाण होतं, त्यामुळे कर्जतकर कुणाच्या बाजूने उभे राहणार ? शिवसेनेच्या की फुटीरतावाद्यांच्या हे पाहण्यासाठी आलो असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. गेले ती घाण गेली हे बरं झालं , पावसाळ्या पूर्वी नालेसफाई झाली, हे बरं झालं अशा बोचऱ्या शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.
आपण याला संकट म्हणून नाही, तर संधी म्हणून पाहतो आहोत, फुटीरतावाद्यांवर अंध विश्वास ठेवला ही चूक झाली, फुटीरतावादयांसाठी यंत्रणेचा पुरेपूर वापर होत असल्याचं सांगत आदित्य ठाकरे यांनी सत्य यांच्या बाजूने असतं तर बंड केलं नसतं असं म्हटलं आहे.
त्यांच्यात हिम्मत असती, मनगटात ताकद असती तर सुरतमध्ये जावून नव्हे, तर घरात बसून बंड केलं असतं, त्यांच्यात हिम्मत नव्हती, म्हणून सुरतेला पळून गेले असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
एक आमदार बोलतोय, काय डोंगर ? काय नदी ? डोंगर आणि नदी पहायची होती, तर आमच्या सह्याद्रीला इथे कर्जतला या, आज इथे असते , तर माझ्या बाजूला बसले असते असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणणारे , या मागे आहेत का ? कुणीही या मागे असलं तरी महाराष्ट्र झुकणार नाही असं सांगत आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली आहे.
शेतकरी पेरणीसाठी खोळंबलेत, कृषी मंत्री गुवाहाटीत, राज्यात दुष्काळ होता पाणीपुरवठा मंत्री गुवाहाटीत आहेत. मला काही ऐकू आलंय की तिथे आमदार दुपारी उशिरा उठतात आणि मग जिम करतात , मग जेवण मग रात्री झोपतात, रात्री स्पेशल डान्सचा कार्यक्रम पण असतो, काही आहेत तिकडे, जे सात वाजले की थरथरायला लागतात असा उपरोधिक टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
आयपीएलमध्ये विक्री होते तशी यांनी स्वतःची विक्री केलीय, मी पण वाट पाहत होतो, काही ऑफर येते का? पण माझ्या रक्तात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त आहे, फुटीरतावाद्यांसोबत असलेल्या 10-12 आमदारांना परत यायचं आहे, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले राहतील असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
गुलाबराव पाटील यांना माझ्या गाडीत बसवलं तर थरथरायला लागले, नंतर एका कार्यकर्त्याने सांगितलं 7 वाजलेत म्हणून थरथरायला लागलेत , लाज वाटते अशा लोकांची. ज्यांना शत्रू समजत राहिलो ते तर आपल्या बाजूने उभे आहे , आणि ज्यांना आपलं समजत राहिलो, त्यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगला सोडावा लागलाय.
दीपक केसरकर बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी झाल्यानंतर 2 वर्षांनी शिवसेनेत आले आणि हे आम्हाला सांगतात , 'ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही', फुटीरतावादी आमदार खोटे बोलतायत, ते आता शिवसेनेत राहू शकत नाही, त्यांची लायकीच नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
फुटीरतावाद्यांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही असा इशारा देत आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्या आणि निवडणुकीला उभे रहा असं आव्हान दिलं आहे. यांना पाडल्याशिवाय आदित्य ठाकरे नाव सांगणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.