कोरोनापेक्षा 'हे' भयंकर... सरकारच्या हेल्पलाईनवर बाल अत्याचार आणि हिंसाचाराबद्दल ९२,००० फोन कॉल

लॉकडाऊनच्या काळात समोर आलेली धक्कादायक माहिती 

Updated: Apr 9, 2020, 01:46 PM IST
कोरोनापेक्षा 'हे' भयंकर... सरकारच्या हेल्पलाईनवर बाल अत्याचार आणि हिंसाचाराबद्दल ९२,००० फोन कॉल title=

मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण देशभरात आपलं जाळ पसरलं आहे. चीनमधून पसरलेला हा व्हायरस आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. असं असताना सगळ्यांना घरी राहण्याचा सल्ला दिला जात आहे. असं असताना चाईल्डलाईन इंडिया हेल्पलाईनला लॉकडाऊनच्या दिवसांत ९२ हजाराहून अधिक कॉल हे बाल अत्याचार आणि हिंसाचारापासून संरक्षण मिळावे यासाठी आले आहेत. कोरोनापेक्षा ही माहिती अतिशय भयानक आहे. 

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केलं आहे. मात्र हा लॉकडाऊन केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर अत्याचार होणाऱ्या प्रत्येकासाठी त्रासदायक ठरला आहे. या पीडितांना फक्त कोरोनापासून नाही तर घरातच अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांपासून स्वतःच संरक्षण करायचं आहे. 

लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात २० ते ३१ मार्च याकाळात देशभरातून ३.०७ लाख कॉल हे 'चाईल्डलाऊन १०९८' या हेल्पलाईन क्रमांकावर आले. यामधील ३०% फोन म्हणजे ९२,१०५ एवढे फोन कॉल हे बाल अत्याचार आणि हिंसाचारापासून रक्षण करण्यासाठी आल्याची माहिती चाईल्डलाईन इंडियाच्या संचालिका हर्लिन वालिया यांनी दिली. 

वालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चला आपल्या भाषणानंतर लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर या कॉलमध्ये ५०% वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे या फोनकॉलमध्ये फिजिकल हेल्थ (११%) बालमजुर (८%), हरवलेली आणि पळून गेलेली मुलं (८%)  आणि घर नसलेली मुलं (५%) फोन कॉल आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 

तसेच चाईललाईन हेल्पलाईनला १,६७७ फोन हे कोरोनाव्हायरस आणि त्यासंदर्भातील प्रश्नाकरता आल्याची माहिती मिळाली. लॉकडाऊन दरम्यान वालिया यांनी हेल्पलाईनला आवश्यक सेवा घोषित करण्याची सूचना केली आहे.