मुंबई : राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेला सत्तास्थापनेसाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. आता आम्ही शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट बघत आहोत, असं मुनगंटीवार म्हणाले. पण शिवसेनेला पाठवलेला प्रस्ताव नेमका काय आहे, हे मात्र मुनगंटीवार यांनी सांगितलं नाही. शिवसेनेला पाठवलेला प्रस्ताव जाहीर करायचा नाही, असं बैठकीत ठरल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
भाजपच्या कोर कमिटीची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे उपस्थित होते.
सरकार स्थापन करायला नैसर्गिक वेळ द्यावा लागेल, लवकरच गोड बातमी मिळेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. तसंच देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील. भाजपचा संपूर्ण प्लान तयार आहे, आम्ही शिवसेनेची वाट पाहू, असं मुनगंटीवार म्हणाले.