Thane News : लोक मस्करीमध्ये एखाद्याला त्याच्या वजनावरुन तू खाली पडलास तर तुला उचलायला क्रेन लागेल किंवा चार ते पाच माणसं लागतील असे म्हणतात. परदेशात लठ्ठपणामुळे (Obesity) अनेकांना त्यांच्या बेडवरुन उठणं अवघड होत असल्याने कधी कधी लोकांची मदत घ्यावी लागते. मुंबईपासून जवळच असलेल्या ठाण्यातही (Thane) असाच काहीसा प्रकार घडला आहे. बेडवरुन खाली पडलेल्या एका महिलेला उचलण्यासाठी चक्क महापालिकेच्या (TMC) कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली आहे. ही विचित्र घटना सध्या चर्चेत आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, 7 सप्टेंबर रोजी ठाण्यातल्या वाघबीळ परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. 160 किलो वजनाची एक महिला सकाळी अंथरुणातून उठण्याच्या प्रयत्नात खाली पडली होती. संपूर्ण कुटुंबाकडूनही महिलेला जाग न ठेवता आल्याने कुटुंबीयांना महापालिकेची मदत घ्यावी लागली. महिलेला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
ठाण्यातील वाघबीळ परिसरात एका फ्लॅटमध्ये राहणारी 160 किलो वजनाची महिला सकाळी 8 वाजता अचानक खाली कोसळली. या 62 वर्षीय महिलेची प्रकृतीही बिघडली होती. सकाळी कुटुंबीयांनी आजारी महिलेला खाटेखाली पाहिले असता तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी महिलेला उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र कुटुंबीय तिला उचलू शकले नाहीत. त्यामुळे ते आणखीनच काळजीत पडले.
160 किलो महिलेला कोणालाच उचलता न आल्याने त्यांनी ठाणे महापालिकेकडे (TMC) मदत मागितली. टीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितले की, घाबरलेल्या कुटुंबाने अग्निशमन दलाला फोन करून मदत मागितली होती. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा आरडीएमसी तातडीने महिलेच्या घरी पोहोचले. पथकाच्या सदस्यांनी महिलेला जमिनीवरून उचलून बेडवर ठेवले.
पीटीआयशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेडवरून पडल्यामुळे महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की त्यांना अनेक प्रकारचे मदतीचे फोन येत असतात. पण महिलेला बेडवर उचलून ठेवण्यासाठी फोन येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, महिलेला कोणत्या आजाराने ग्रासले होते किंवा घरातील सदस्य तिला का उचलू शकले नाहीत अशा प्रश्नांची कुटुबियांकडे कोणतीच उत्तरे नव्हती. कुटुंबीयांनी माध्यमांसोबतही बोलण्यास नकार दिला.