दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : दूध भेसळ करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंतची शिक्षा करणारा कायदा लवकरच राज्यात करण्याबाबतची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभेत दूध भेसळीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली आहे. सध्या दुधात भेसळ करणाऱ्यांना सहा महिन्यांची शिक्षा आहे. मात्र, सहा महिन्यांची शिक्षा असल्याने याप्रकरणात लगेच जामीन होतो. ही शिक्षा तीन वर्षांपर्यंत वाढवली तर आरोपीला जामीन होणार नाही. त्यामुळे तीन वर्षाची तरतूद असणारा कायदा लवकरच केला जाईल, असं बापट यांनी यासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं.
दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी अनेक आमदारांनी विधानसभेत केली. मात्र, जन्मठेपेची शिक्षा करणारा कायदा आणण्यात अडचणी असल्याचं बापट यांनी यावेळी सांगितले.
सध्या दूध भेसळीची तपासणी करण्यासाठी राज्यात चार मोबाईल व्हॅन आहेत. मात्र, ज्या सातत्याने या व्हॅनद्वारे तपासणी व्हायला हवी, ती होत नसल्याबद्दल कबुली देताना संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत समज देण्यात येईल, असे सांगत यापुढे तपासण्यांमध्ये अधिक सातत्य असेल अशी ग्वाही बापट यांनी विधानसभेत दिली.
मुंबईत येणाऱ्या दुधाच्या गाड्या तसंच राज्यातील काही भागातील गाड्या अचानक या मोबाईल व्हॅनद्वारे तपासण्यात येतील, असे बापट यांनी सांगितले.