कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या छोट्या-मोठ्या कुरबुरींची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घ्यावी लागली आहे. मंत्रिमंडळाची बैठक होण्यापूर्वी दादरच्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात एक बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरच रायगडचे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, शिवसेना आमदार भारत गोगावले आणि दोन्ही पक्षांचे काही पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ज्या तालुका आणि जिल्ह्यामध्ये महाविकासआघाडीतील दोन्ही पक्ष प्रबळ आहेत तिकडे कुरबुरी दिसून येत आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीही मजबूत आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या मदतीमध्ये पालकमंत्री आदिती तटकरे दिसत आहेत.
शिवसैनिकांना विश्वासात न घेता आदिती तटकरे काम करत असल्याचे आक्षेप तिथले स्थानिक शिवसेना पदाधिकारी वारंवार नोंदवत होते. अशा अनेक कुरबुरी रायगड जिल्ह्यात समोर येत होत्या. त्याची दखल आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली.
पालकमंत्र्यांना त्यांचं स्थान द्यावच लागेल, पण पालकमंत्र्यांनीही विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. कारण महाविकासआघाडी तिन्ही पक्षांची मिळून झाली आहे, त्यामुळे स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन कामं होणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना अशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्या.
निसर्ग चक्रीवादळात सरकार आणि सामाजिक संस्थांकडून आलेली मदत फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच वाटली जाते, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगडे यांनी केला होता.
'इथले तहसीलदार आणि प्रांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांमार्फत साहित्य वाटण्याचा घाट घालत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकं फक्त श्रीमंत लोकांनाच धान्य देत आहेत. त्यांच्या लोकांनाच मदत दिली जात आहे आणि ही मदतही त्यांच्याच घरी ठेवली जात आहे. तहसीलदार आणि प्रांत यांना खासदार आणि पालकमंत्री हे करायला लावत आहेत. पालकमंत्र्यांना फक्त आपला पक्ष दिसत आहे. हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत का पक्षाचे आहेत,' अशी टीका शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी केली होती. आदिती तटकरे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.