मुंबई: राज्यातील नेत्यांनी पगड्यांचे राजकारण करु नये. किंबहुना पगडी घालणाऱ्या नेत्यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेतला. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात यापुढे कार्यक्रमात टिळकांच्या नव्हे तर फुलेंच्या पगडीचा वापर व्हावा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते.
यावरुन उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. आजच्या घडीला आपण महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांच्या पगडीचे राजकारण करतो आहोत. मात्र ते करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.
यावेळी उद्धव यांनी भाजप सरकारवरही टीका केली. जुमलेबाजीने देशाचा घात केला आहे. सध्या देशात छुप्या पावलांनी आणीबाणी प्रवेश करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आम्ही इंग्रजांची आणि इंदिरा गांधींची गुलामगिरी उखडून फेकून दिली. आतादेखील असा प्रयत्न झाल्यास जनता तेच करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.