Maharashta Political Crisis : सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीने भाजपच्या कोअर टीमची बैठक बोलावण्यात आली होती. कोर्टाने दिलेला निर्णय, शिवसेनेत झालेली फूट, राज्यातील परिस्थिती या सर्वांवर भाजपच्या कोअर टीमच्या बैठकीत मंथन झालं. याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी मीडियाल माहिती दिली.
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप कोअर टीमचं पूर्ण लक्ष असून भविष्यात आपली भूमिका ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यात विशेष करुन विधीमंडळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचं आकलन आणि त्याचा अंदाज यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती सुधीर मुनगंटीवर यांनी दिली.
राज्यातील राजकीय प्रश्न लक्षात घेऊन भाजप आपली भूमिका ठरवण्यात येणार आहे. सध्या भाजपची वेट अँड वॉचची भूमिका आहे. सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत आम्हाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही तसंच फ्लोअर टेस्टची मागणी करण्याची आजतरी आम्हाला गरज वाटत नाही असंही मुनगंटीवर यांनी स्पष्ट केलं.
भाजपच्या रणनीतीबद्दल आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची चर्चा झाली. फडणवीसांसह चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडेंसह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.