www.24taas.com, नवी दिल्ली
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर टीम अण्णा पुन्हा आक्रमक झालीय. उद्यापासून टीम अण्णांचं जंतरमंतरवरच्या नियोजित आंदोलनाला सुरूवात होणार आहे. यासाठी आज सकाळीच अण्णा दिल्लीकडे रवाना झाले. थोड्यावेळापूर्वीच ते इथं दाखल झालेत.
टीम अण्णा उद्यापासून म्हणजेच २५ जुलैपासून दिल्लीत जंतरमंतरवर बेमुदत उपोषण करणार आहे. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ टीमचं नेतृत्व अरविंद केजरीवाल यांच्याकडे सोपवण्यात आलंय. या आंदोलनासाठी आज अण्णा दिल्लीकडे रवाना झालेत. या अगोदर झालेल्या प्रत्येक आंदोलनाला अण्णा स्वत: उपोषणाला बसले होते. पण, यावेळी मात्र तब्येतीच्या कारणांमुळे ते उपोषणाला बसणार नाहीत. त्यांच्याऐवजी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, गोपाल राय अशी मंडळी उपोषण करणार आहेत. बाबा रामदेव यांनाही या आंदोलनासाठी आमंत्रित केलं गेलंय.
२५ जुलैपासून अनिश्चित काळासाठी हे उपोषण सुरू राहणार आहे. याच दिवशी नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शपथ घेणार आहेत. टीम अण्णाला ८ ऑगस्टपर्यंतच जंतरमंतरवर आंदोलनाला परवानगी मिळालीय. या दिवसापासून ससंदेच्या मान्सून अधिवेशनालाही सुरूवात होणार आहे. संसदेतील १४ भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हे आंदोलन असून त्या भ्रष्ट मंत्र्यांची यादी याआधीच त्यांनी सोपवलीय.
.