www.24taas.com, नवी दिल्ली
प्रभावी लोकपाल विधेयक आणि १४ भ्रष्ट मंत्र्यांविरोधात कारवाई या मागणीसाठी टीम अण्णानं जंतर-मंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलंय. सरकारनं दरवेळी फसवणूक केल्याचा आरोप करत, यावेळी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषणावरून हटणार नसल्याचा इरादा टीम अण्णानं व्यक्त केलाय.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध रणशिंग फुंकलंय. १४ मंत्र्यांविरोधात कारवाई आणि प्रभावी लोकपाल विधेयकाची मागणी करत टीम अण्णा बेमुदत उपोषणाला बसलीय. चार दिवसांत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर स्वतः अण्णादेखील त्यांच्या टीमसोबत उपोषण सुरु करणार आहेत.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच अण्णांनी सरकारवर धोका दिल्याचा आरोप केलाय. टीम अण्णा यावेळी 'जिंकू किंवा मरू' या इराद्यानंच उपोषणाला बसलीय. निर्णय झाल्याशिवाय उपोषण मागं न घेण्याचा इरादा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलाय. तर टीम अण्णांचे आरोप बिनबुडाचं असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी युवक काँग्रेस (NSUI) कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला, असा टीम अण्णाचा आरोप आहे. आता सरकार हे आंदोलन कसं हाताळतं, अण्णांचा अल्टिमेटम सरकार गांभिर्यानं घेतं का, याबाबत उत्सुकता आहे.
.