संगमांचं जेडीयू-सेनेला पाठिंब्यासाठी आवाहन...

आज दुपारी भाजपनं पी. संगमा यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपनं जाहिर केलेल्या पाठिंब्यामुळे पी. संगमा यांचा आत्मविश्वासही दुणावलाय. भाजपनंतर आता जेडीयू आणि शिवसेनेलाही समर्थनासाठी गळ घातलीय.

Updated: Jun 21, 2012, 07:03 PM IST

 www.24taas.com, नवी दिल्ली 

 

आज दुपारी भाजपनं पी. संगमा यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपनं जाहिर केलेल्या पाठिंब्यामुळे पी. संगमा यांचा आत्मविश्वासही दुणावलाय. भाजपनंतर आता जेडीयू आणि शिवसेनेलाही समर्थनासाठी गळ घातलीय. तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही त्यांनी सहकार्य देण्याची मागणी केलीय. तसंच ज्या दोन मुख्यमंत्र्यांची नावं घेणं त्यांनी अगोदर टाळलं होतं त्यांचीही नावं संगमा यांनी आज जाहीर केलीत. ते दोन मुख्यमंत्री म्हणजे जयललिता आणि नवीन पटनायक हे आहेत.

 

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी लोकसभा अध्यक्ष पूर्णो संगमा यांच्या राष्ट्रपतीपदाच्या दाव्याला आता लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी पक्षाचा पाठिंबा जाहीर केलं. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी आणि संगमा यांच्यातील लढत रंगतदार होणार हे निश्चित झालंय. संगमा यांनी याआधीच राष्ट्रवादीचा आणि मेघालय विधासभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.

 

मी कोणत्याही एका पक्षाचा उमेदवार नाही. माझं नाव देशातील दोन प्रबळ मुख्यमंत्र्यांनी उचलून धरलंय. त्यासाठी मी या दोघांचाही आभारी आहे. भाजपनं मला पाठिंबा दिल्यानं मी खूप खूश आहे. फक्त भाजप नाही तर अकाली दल, झारखंड मुक्ती मोर्चा आणि इतर छोट्या पक्षांनीही मला पाठिंब्याचं आश्वासन दिलंय, असं संगमा यांनी यावेळी म्हटलं. पश्चिम बंगलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी इच्छाही संगमा यांनी यावेळी व्यक्त केली. १९ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे.

 

.