www.24taas.com, रायगड
रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.
शेतमालाला जास्त पैसे मिळतील या आशेनं शेकडो शेतकऱ्यांनी आपल्याकडील धान्य व्यापाऱ्याला दिलं. मात्र त्यांना अद्याप त्याचे मिळाले नाहीत. भरत जैन, हिरा जैन आणि सुमीत जैन हे गेल्या २५ वर्षांपासून धान्याचे व्यापारी आहेत. बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्यानं कोलाड परीसरातल्या सुमारे ३०० शेतकऱ्यांनी आपल्याकडील धान्य या व्यापाऱ्य़ांना दिलं. मात्र मुदत टळून गेल्यावरही शेतक-यांना त्यांना त्यांच्या धान्याचे पैसे मिळाले नाहीत.
शेतात राबून कमविलेले पीकही गेले आणि पैसेही गेल्यानं अनेक शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे. व्यापारी भरत जैन कुटुंबानं सुमारे दोन कोटी रुपयांचे धान्य हडप केलंय. कोलाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुनही कारवाई न झाल्यानं शिवसेनेनं रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.