www.24taas.com, मुंबई
पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.
पुढील आठ दिवसांत गोदावरी पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यास एक हजार मेगावॅट वीज निर्मिती बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळं राज्याला मोठा फटका बसण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. पाणीटंचाईमुळे वीजनिर्मीतीवर परिणाम होऊ नये म्हणून वीज केंद्राने पैठण येथील नाथसागर आणि माजलगाव जलाशयातून पाणी विकत घेतलेले आहे. मात्र, या दोन्ही जलाशयातील पाणीसाठा सध्या खालावत चाललाय. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पातून आता परळी वीज निर्मिती केंद्राला पाणी पुरवणे अशक्य आहे. पाण्याअभावी वीज निर्मिती ठप्प झाल्यास त्याचा राज्यातील वीजपुरवठ्यावर परिणाम होऊन राज्याचा बराच मोठा भाग अंधारात जाण्याची भीती आहे.
परळीत २१० मेगावॅट क्षमतेचे तीन आणि २५० मेगावॅट क्षमतेचे दोन असे एकूण पाच संच सध्या सुरु आहेत.