www.24taas.com, मुंबई
पीएसआय सूर्यवंशी मारहाण प्रकरणातील आमदार या प्रकरणातून सहीसलामत सुटण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट रेकॉर्डिंग झालंच नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे पोलिसांला मारहाण करणाऱ्या या आमदारांना संशयाचा फायदा मिळू शकतो.
सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणात विधान भवनातील सीसीटीव्ही कॅमेरात या मारहाणीचं स्पष्ट रेकॉर्डिंग झालीच नसल्याची माहिती आता पुढे येतेय. त्यामुळे संशयाचा फायदा मिळून आमदार यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना विधान भवन परिसरात झालेल्या मारहाणीनंतर पाच आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना याप्रकरणी तीन दिवस तुरुंगवासही भोगावा लागला. तसचं पीएसआय सचिन सूर्यवंशी यांचंही चौकशीपर्यंत निलंबन करण्यात आलंय. आता गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापण्यात आलेली समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
मात्र, सीसीटीव्हीत या मारहाणीचं रेकॉर्डिंगच न झाल्यानं याचा फायदा आमदारांना मिळण्याची शक्यता आहे. विधानभवनात एकूण २८ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, त्यांचा उपयोग काय? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय. आता याचा गाजावाजा झाल्यानंतर सीसीटीव्हींची संख्या वाढवण्याची घोषणा करण्यात आलीय.