www.24taas.com, महेश पोतदार, उस्मानाबाद
दुष्काळाच्या छायेत आसणा-या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं दुष्टचक्र सुरु झालयं. गेल्या 10 महिन्यात 152 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील 23 आत्महत्या या उस्मानाबाद जिल्ह्यात झाल्या आहेत. नियतीचा फास शेतक-यांभोवती आवळला जात असताना संवेदनाहीन प्रशासन मात्र, शेतक-यांच्या आत्महत्त्यांवर फक्त ‘पात्र आणि अपात्र’ याचा शिक्का मारण्यातच मशगुल झालेत.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या नागझरवाडी येथील हे घर आहे वालचंद साळुंखे या दुर्दैवी शेतक-याचं...१७ सप्टेंबरला, ऐन मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी, त्यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.. इंदापूरच्या नरसिंह सहकारी साखर कारखान्याला त्यांनी मागील हंगामात आपला उस घातला होता. वारंवार तक्रारी करूनही, त्याचं उसाचं बिल कारखान्यानं दिलं नाही. तसंच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या, खामसवाडी शाखेनेही त्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अखेर साळुंखे यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला. विशेष म्हणजे कारखाना आणि बँक प्रशासनावर गुन्हा दाखल होऊनही साळुंखे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही.
वडिल घरातील कर्ते होते ,त्यांच्या माघारी जबाबदारी माझ्यावर येवून पडली आहे. तसेच यावर्षी पाऊस नसल्यामुळे पिक-पाणी नाही. सध्या आम्ही पोतभर ज्वारीलाही महाग झालो आहोत. कारखाना आणि बँके वर गुन्हादाखल होऊन ही , पिक कर्ज आणि उसाचे बिल दिले नाही. दयनीय अवस्था आमची झाली आहे, असे गोकुळ साळुंखे या मयत शेतक-याचा मुलाने सांगितले.
पतीची आत्महत्या आणि गरिबीमुळे अविदाबाई वालचंद साळुखे या पुरत्या खचून गेल्या आहेत.. पतीच्या निधनानंतर त्यांची दोन मुलं पुण्याला मजुरीसाठी गेली आहेत.. त्यांच्याकडे ८ एकर शेतजमीन आहे.. पावसाअभावी या शेतातून खाण्याएव्हढंही धान्य आलेलं नाही. आता वर्षाभर खायचं काय अशी चिंता त्यांना लागून राहिलीय.
पिक पाणी नाही, पाऊस नाही, शेतात ज्वारी –गहू नाही,उस आहे पण त्याला पाणी नाही, कर्ते होते ते गेले,.. दोन लेकर तीकडे (पुण्यात –मजुरी साठी ) गेली आहेत , हा एकटा काय करणार , वैतागून गेलोय..दावणीला बैल बांधून आहेत, असे अविदाबाई वालचंद साळुंखे या मयत शेतक-याच्या पत्नीने सांगितले.
या भागातल्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झालाय. पण आता निगरगट्ट प्रशासनाचं सुलतानी संकटही त्यांना स्वस्थ बसू देत नाहीये. शेतक-यांच्या आत्महत्यांवर फक्त पात्र आणि अपात्राचा शिक्का मारण्यातच मशगुल झालेल्या प्रशासनाला आणखी किती शेतक-यांचे बळी हवे आहेत...असा संतापजनक प्रश्न शेतक-यांना पडलाय