औरंगाबाद-नगर हायवे मृत्यूचा सापळा

औरंगाबादसाठी औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला आणि औरंगाबाद-पुण्याला जोडणारा हा आहे औरंगाबाद-अहमदनगर हायवे... मात्र औरंगाबादकरांच्या दृष्टीनं हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 1, 2013, 07:42 PM IST

विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादसाठी औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला आणि औरंगाबाद-पुण्याला जोडणारा हा आहे औरंगाबाद-अहमदनगर हायवे... मात्र औरंगाबादकरांच्या दृष्टीनं हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय. गेल्या 10 वर्षात या रस्त्यावर आत्तापर्यंत 300 हून अधिक नागरिकांचा बळी गेलाय. मुख्य म्हणजे ज्याठिकाणी हे अपघात घडतात तो रस्ता कँटोनमेंट भागातून जातो... आणि कँटोनमेंट रस्त्यासाठी जागा देण्यास तयार नसल्यामुळे महापालिका तसंच सार्वजनिक विभाग या भागात रस्ता बांधू शकत नाही. म्हणूनच या अरुंद रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय.
2012 मध्ये या रस्त्यावर 28 जणांचा मृत्यू झालाय तर 45 जण गंभीर जखमी झालेत. 2011 मध्ये तर तब्बल 135 जणांचा बळी गेलाय... आणि 200 हून अधिक जण जखमी झाले.तर 2010 मध्ये 90 जणांचा मृत्यू झाला तर 135 हून अधिक जण जखमी झालेत.
राजकीय पक्षांबरोबरच रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांनीही या रस्त्यासाठी आंदोलनं केली.. त्यानंतर कँटोनमेंट विभागानं दीड कोटी खर्चून रस्ता थोडा मोठा केला मात्र अजूनही या रस्त्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. पोलिसांनीही ट्रॅफिकची समस्या पूर्णपणे सोडवण्यात अपयश येत असल्याचं मान्य केलंय.
संरक्षण विभाग रस्त्यासाठी अखेर जागा द्यायला तयार झालाय, मात्र रस्त्यात संरक्षण विभागाची 22 एकर जागा जाणार आहे. त्यामुळे या जागेच्या मोबदल्यात संरक्षण विभागानं 22 एकर जागेची मागणी केली. मात्र अजूनही संरक्षण विभागाला आवडेल अशी जागा मिळाली नाही, तर राज्य सरकारनं आता या रस्त्यासाठी 20 कोटी रुपये सुद्धा मंजूर केलेत... आता प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्षात रस्त्याचं बांधकाम सुरु होण्याची...