www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
एखाद्याकडे थकबाकी असेल तर आपण सर्वसामान्यपणे पोलिसांची मदत घेतो. मात्र पोलीसच जर थकबाकीदार असेल तर...प्रश्न पडला ना? असाच प्रश्न पडलाय औरंगाबादच्या श्रद्धा महिला विकास मंडळाला... कारण या मंडळाची पोलीस विभागाकडे वर्दीच्या शिलाईची चार लाखांची थकबाकी आहे. ज्यामुळं या मंडळानं काम तर बंद केलंय, मात्र उधारी वसूल कशी करायची हा मोठा प्रश्न पडलाय....
पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते खाकी वर्दीतलं रुबाबदार व्यक्तिमत्व. पोलिसांच्या खांद्यावर चमकणारे तारे वर्दीची शोभा वाढवतात. मात्र पोलिसांची शान असणा-या या वर्दीची लाखोंची शिलाई पोलीस विभागानं थकवल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये समोर आलाय. दरवर्षी पोलिसांना एक गणवेश दिला जातो. त्याचं कापड पोलीस विभागाकडून खरेदी केलं जातं. आणि स्थानिक शिंपीकाम करणा-या ठेकेदाराकडून निकषानुसार गणवेश शिवून घेतले जातात. औरंगाबाद पोलिसांची वर्दीच्या शिलाईचं काम शहरातल्या श्रद्धा महिला विकास मंडळास मिळालंय. मात्र या मंडळास गेल्या सहा महिन्यांपासून चार लाखांची रक्कमच मिळालेली नाही. उधारी वसूल करण्यासाठी मंडळानं पोलीस आयुक्तालयात चारपेक्षा अधिक विनंतीअर्ज केले, पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळं आता उधारीची रक्कम मिळेपर्यंत वर्दी शिवून देणार नसल्याचं या मंडळानं पोलिसांना सांगितलंय..
वर्दी शिलाईचं काम मिळाल्यानंतर श्रद्धा महिला विकास मंडळाच्या प्रमुख कमल झरे यांनी आणखी २०-२५ जणींना रोजगार उपलब्ध करून दिला होता. नव्यानं घर दुरुस्तीही हाती घेतली. मात्र देयकं थकल्यानं शिलाईचं काम करणारे कारागीर निघून गेले. ज्या बँकेनं व्यवसायासाठी कर्ज दिलं होतं, त्यांनीही आता कर्जाच्या हप्त्यासाठी नोटीस बजावलीय. त्यामुळं पुन्हा या मंडळाला आपला व्यवसाय उभा करण्यासाठी पोलीस विभागाच्या सहाय्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.