आकांत : दुष्काळाला कंटाळून मोसंबीची बाग दिली पेटवून

दुष्काळाच्या ग्रहणाला कंटाळून औरंगाबादमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या जीवापाड जपलेली मोसंबीची बाग पेटवून दिलीय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सांजखेडा गावात ही हृदयद्रावक घटना घडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 12, 2013, 02:27 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
मराठवाड्यात दुष्काळ शेतकऱ्यांच्या जीवावरच उठलाय. याच दुष्काळाच्या ग्रहणाला कंटाळून औरंगाबादमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या जीवापाड जपलेली मोसंबीची बाग पेटवून दिलीय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सांजखेडा गावात ही हृदयद्रावक घटना घडलीय.
कमर खान या शेतकऱ्यानं सरकारी अनास्थेला कंटाळून १२ एकर मोसंबीची बाग जाळून टाकलीय. सरकारनं सुकलेल्या बागेला एकरी ३१०० रुपये मदत जाहीर केलीय. मात्र, एक एकर बाग तोडायला जवळजवळ २५ हजार रुपये खर्च येतो. हा खर्च परवडत नसल्यानं शेतकऱ्यानं संपूर्ण बागेलाच आग लावून दिली.

शेतीची जाण असणाऱ्या कुणालाही या परिस्थितीची जाणीव तात्काळ होईल, पण गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या सरकारपर्यंत याची धग पोहचेल का? असा प्रश्न शेतकरी आकांतानं विचारत आहेत.