www.24taas.com, औरंगाबाद
मनसेचे औरंगाबादच्या कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा मागे घेतलाय. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपण हा निर्णय घेतला असल्याचा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिलाय. आमदारकीचा राजीनामा मागे घेत असलो तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मात्र परतणार नाही अशी भूमिका आता जाधवांनी घेतलीय.
मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडं आपला आमदारकीचा राजीनामा सोपवला होता. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. पक्षामध्ये अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं सांगत, स्वाभिमान दुखावल्यामुळेच राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मनसेच्या जोखडातून मुक्त झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, हर्षवर्धन जाधव यांच्या या नव्या भूमिकेमागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. काल पवार यांनी हर्षवर्धन जाधव यांना फोन करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याशी फोनवरून चर्चा करून राजीनामा न देण्याचा आग्रह अजित पवारांनी जाधवांना केला होता.