www.24taas.com, झी मीडिया, बीड
सततच्या छेड़छाडीला वैतागून बीड जिल्ह्यात एका महाविद्यालयीन तरुणीने विष पिऊन आत्महत्या केलीय. बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यातील पहाडी पारगावमध्ये ही घटना घडली.
विशेष म्हणजे एक वर्षापूर्वी तिच्यावर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच तरूणीची छेडछाड करत होता. त्यामुळे या सततच्या त्रासाला कंटाळून तिने आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणातील आरोपी महेश मुंडे हा सध्या फरार आहे. त्यामुळे पोलीस काय करत होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गावांपासून ते शहरांपर्यंत गंभीर बनला आहे. बीड जिल्ह्यातल्या आणखी एका घटनेनं पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढलेत. बीडच्या धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव इथली महाविद्यालयीन तरुणी छेड़छाडीची बळी ठरली आहे. एक वर्षा पूर्वी याच गावातील महेश मुंडे नावाचा आरोपीने या महाविद्यालयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्यावेळी त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली होती. मात्र काही महिन्यातच तो तुरुंगाच्या बाहेर आला. मंगळवारी रात्री आरोपी महेश मुंडे याने पुन्हा या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी घरी रडत आली, पण कुटुंबातील लोकांनी तिच्याकडे लक्षच दिलं नाही, अशी कबुली मुलीच्या भावानं दिलीय.
या सर्व घटनेचा मानसिक धक्का बसलेल्या तरूणीनं विष घेतलं. यानंतर नातेवाईकांनी तरूणीला आधी चिंचोली इथल्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, प्रकृती आणखीन नाजूक झाल्यानं तिला बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
आरोपी महेश मुंडे हां स्वतःला महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून घेतो. या आरोपी महेश मुंडेची गावात प्रचंड दहशत आहे. गावातील कोणीच व्यक्ती त्याच्या पुढे जात नाही. पीड़ित तरूणीच्या परिवारालाही आरोपी महेश मुंडे धमक्या देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय.
दरम्यान, गावात पोलिसांचं एक पथक दाखल झालंय. मुलीच्या कुटुंबीयांचं जबाब पोलिसांनी घेतले. पोलीस आल्याची खबर लागताच आरोपी महेश मुंडे गावातून फरार झालाय. आता त्याला पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. मात्र, एवढे दिवस पोलीस यंत्रणा काय करत होती? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.