www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. जालन्याहून औरंगाबादकडे कारने निघालेले राज. वेळ रात्री नऊची. याच दरम्यान, धूम स्टाईलने जाणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांनी राज यांची गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झालेत. मात्र, जोरात ब्रेक लावल्याने ते खाली कोसळले. चांगलेच धुंद तर्ऱ झालेले तरूण मनसे कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडले आणि त्यांना धूधू धुतले. नंतर राज गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी त्या दोघा धुंद तरूणांची समजूत काढली. त्यांना स्वत:कडील पैसे दिले आणि आयुष्यात पुन्हा मद्याला हात न लावण्याच सल्ला दिला. राज यांच्या या गांधीगिरीमुळे कार्यकर्ते गोंधळात पडले.
राज्यात दुष्काळ पडल्याने राज ठाकरे यांनी काही भागांची पाहणी केली. तर मनसेनेने सुरू केलेल्या चारा छावण्यांची पाहणी केली. जालना येथील चारा छावणीची पाहणी करून ते औरंगाबदकडे निघाले होते. याचदरम्यान हा प्रसंग घडला. रात्री नऊच्या सुमारास झाल्टा फाट्यावर दोन तरूणांनी राज ठाकरे यांना गाडीत पाहिले. त्यांनी उत्साहाच्या भरात राज यांच्या गाडीबरोबर जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी ब्रेक लावल्यानंतर गाडी स्लीप झाली. त्याचवेळी राज यांचीही गाडी थांबली.
राज गाडीतून खाली उतरले. राज यांच्या ताफ्यातील काही लोकांनी या तरूणांना तोपर्यंत चोप दिला. मात्र, राज यांनी दोघा तरूणांना बोलावून घेतले. गाडी शिस्तीत चालविण्याचा सल्ला दिला. दुचाकीवरून पडल्याने तरूणांचे कपडे फाटले होते. हे लक्षात येताच राज यांनी आपल्याकडील पैसे पुढे केले आणि तरूणांना कपडे घेण्यास सांगितले. पुन्हा असे काहीही करू नका. त्या दोघांची समजूत काढून राज ठाकरे पुढे औरंगाबादकडे रवाना झालेत.