www.24taas.com, मुंबई
हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. आज दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८७ व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालंय. बाळासाहेबांच्या निधनामुळे समस्त शिवसैनिक आणि मनसैनिकासह संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगरच कोसळलाय.
'आम्ही त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण आम्ही त्यात अपयशी ठरलो आणि आज दुपारी ३.३०च्या सुमारास बाळासाहेबांची प्राणज्योत मालवली' अशी माहिती बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉ. जलील पारकर यांनी दिलीय. याबरोबरच शिवसैनिकांनी शांतता राखावी असं आवाहनही शिवसेनेकडून करण्यात आलंय. उद्या (रविवारी) सकाळी सात वाजल्यापासून बाळासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. समस्त शिवसैनिकांना सकाळी सात वाजल्यापासून बाळासाहेबांचं अंतिम दर्शन घेता येईल. तसेच त्याच्यावर शिवाजीपार्कवरच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांमध्ये जास्तच खालावली होती. राज्यभरातील त्यांचे चाहते आणि शिवसैनिक त्यांच्या प्रकृती विषयी काळजी करत होते... प्रार्थना करत होते.
नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या चाहत्यांना त्यांचं जाहीर भाषण ऐकण्यास मिळालं होतं. पण, दु:खद बाब म्हणजे याही वेळेस प्रकृती साथ देत नसल्यानं बाळासाहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी उच्चारलेले ‘शिवसैनिकांना प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र इच्छा होती. पण, काय करू…? माझी दुखणीच चालूच आहेत, पण कमी प्रमाणात.... हे चालूच आहे. आपल्या भेटीला यायची इच्छा असूनही शारीरिकदृष्ट्या कमकुवत झालोय. खूप इच्छा होती... यावं, भेटावं, बोलावं... पण, तुम्हाला कल्पना येणार नाही. माझी अवस्था काय आहे ती... नीट चालता येत नाही. मला बोलताना धाप लागतेय, अशा परिस्थितीत मी तुमच्याशी बोलायचं तरी काय? माझं ह्रद्य तुमच्यापाशीच आहे’या शब्दांनी अनेकांना हळवं होण्यास भाग पाडलं होतं.