www.24taas.com, मुंबई
‘ऊस दराच्या आंदोलनाचं स्वरुप आम्ही बदलतोय, ऊस आंदोलक रास्ता रोको करणार नाही’ अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीय. राजू शेट्टी हे आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. त्यांनी मोतश्रीला भेट दिलीय.
‘सध्या बाळासाहेबांच्या काळजीमुळे ‘मातोश्री’चं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातले शिवसैनिक मुंबई गाठत आहेत. त्यामुळे रास्ता रोको करणार नाही पण आम्ही शांततेनं आंदोलन सुरुच ठेवणार आहोत’ असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय. याचबरोबर, शिवारातला ऊस शिवारातच ठेऊ पण कारखानदारांना ऊस देणार नाही, असा इशारा देत आपण ऊस दरवाढीच्या आंदलनावर ठाम असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
ऊस दर आंदोलनाप्रकरणी राजू शेट्टी यांना गेल्या सोमवारी १२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती कालच त्यांची येरवडा जेलमधून जामीनावर सुटका झाली. पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांनी जामीन देण्यात आलाय. पण, यावेळी न्यायालयानं शेट्टी यांनी तीन तालुक्यात प्रवेश बंदीही केलीय. त्यानंतर आज राजू शेट्टी मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी आंदोलनाच्या वाटचालीबद्दल माहिती दिली.