बाळासाहेबांच्या निधनाच्या वृत्तानंतर मुंबई बंद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजतात काही मिनिटात मुंबईतील सर्व व्यवहार बंद झालेत. परळ, दादर, लालबाग, माहिम, गिरगाव अशा मराठीवस्तीच्या भागात शोकाकूळ वातावण होते. येथील वेगाने विविध दुकाने, मॉल्स, बाजार बंद झाले. दरम्यान, सावधगिरीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी मुंबईभरात कडक बंदोबस्त ठेवला होता.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 17, 2012, 07:49 PM IST

www.24taas.com,मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजतात काही मिनिटात मुंबईतील सर्व व्यवहार बंद झालेत. परळ, दादर, लालबाग, माहिम, गिरगाव अशा मराठीवस्तीच्या भागात शोकाकूळ वातावण होते. येथील वेगाने विविध दुकाने, मॉल्स, बाजार बंद झाले. दरम्यान, सावधगिरीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी मुंबईभरात कडक बंदोबस्त ठेवला होता.
सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुंबईतील रस्त्यांवर रिक्षा-टॅक्सी वाहतूक पूर्णत: बंद होती. काही ठिकाणी मार्गावरील बसही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे घरी परतणाऱ्यांना पायपीट करावी लागली.
मुंबईत सर्वच ठिकाणी उस्फूर्तपणे पाचनंतर आपल्या दुकानांचे शटर्स खाली घेतले. मस्जिद बंदर परिसरात विविध बाजारपेठा आहेत. ऐन गर्दीच्या वेळीच तिथे वृत्त निधनाचे वृत्त थडकले आणि थोड्याच वेळातच हे बाजार बंद झाले. कापड बाजार, कागद, रसायने, धान्य अशा सगळ्याच बाजारातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद केले. दरम्यान, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतरही उस्फूर्त बंद पाळण्यात आलाय.
सहा वाजण्याच्या सुमारास तर संपूर्ण मुंबई व परिसरातील सार्वजनिक वाहतूक वगळता सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे दिसत होते. शिवसेनाप्रमुखांच्या निधनाची बातमी समजताच फोर्ट परिसरातील कार्यालयांनाही लवकर सुटी देण्यात आली. त्यामुळे पाच वाजल्यानंतर सीएसटी स्थानकात प्रवाशांची नेहमीपेक्षा प्रचंड गर्दी उसळली होती. विशेषतः महिला वर्ग गाडी पकडून घरी परतण्याच्या लगबगीत असल्याचे दिसत होता.
सीएसटी, दादर, कुर्ला या स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. कुर्ल्यात काही फलाटावर साडेसहाच्या दरम्यान अंधार असल्याने प्रवाशांना गर्दीत चाचपडत राहावे लागले.
दीपावलीनिमित्त शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र असलेले फोर्ट परिसरातील फलक, मोठ्या आकाराचे आकाशकंदील गेले काही दिवस लक्ष वेधून घेत होते. पण शिवसेनाप्रमुखांच्या निधनाचे वृत्त समजताच हे फलक आणि आकाश कंदील शिवसैनिकांनी उतरविले. शिवसेनाप्रमुखांचे ‘एकटा टायगर` असे छायाचित्र असलेला आकाशकंदील उतरवत असताना शिवसैनिक आणि उपस्थित लोकांच्या भावना दाटून आल्या.