दीपक लोखंडे, संपादक, डीएनए इंडिया डॉट कॉम
हा माझा चहा-कॉफी-चहा असा प्रेमाचा प्रवास आहे...मधल्या काळात ग्रीन टी, लेमन टी अशी लफडी करून झाली. पण शेवटी चहावरचं प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, बाकी सगळं शेण असतं, (कॉफीच्या प्रियकर-प्रेयसींनी माफी द्यावी) या निष्कर्षावर मी आलो आहे.
लहानपणी घरात वडील आणि आई दोघेही त्यांच्या आवडीप्रमाणे चहा बनवत असत. तेव्हा चहा म्हणजे ज्याच्यात चपाती (अभिजात भाषेत पोळी) किंवा बिस्कीट बुडवून खायचा द्रवपदार्थ इतकीच चहाबरोबरची तोंडओळख होती.
आता नक्की आठवत नाही पण कधीतरी वडील बनवतात, तो चहा जास्त चांगला लागतो असा शोध लागला. मग त्यांना विचारले असं का...तर लगेच खुष झाले आणि म्हणाले...अरे तुझ्या आईला येतच नाही बनवता चहा. चल मी शिकवतो तुला....
मग त्यांनी त्यांची चहाची पद्धत दाखवली. पाण्यात लगेच चहा पावडर साखर टाकून देऊन छान उकळत बसायचं...मग गडद काळसर रंग आला की त्यात दूध टाकायचं आणि मग परत उकळायचं...दोन मिनिटं उकळल्यावर कपात चहा ओतायचा.
त्यांच्या चहाचं प्रमाणच वेगळं होतं. साखर जास्त, चहा पावडर जास्त.
साधारण दहावीला वगैरे असताना बाजारहाटीची जबाबदारी माझ्याकडे आली.
तोपर्यंत चहाची चव पावडरवर सुद्धा अवलंबून असते हे माहीत नव्हतं
मग ममरीपासून केसरी ममरी इतपत प्रगती झाली. हॉटेल डस्ट नावाची सुद्धा पावडर होती.
घरात उपलब्ध असलेल्या पैशाच्या प्रमाणावर चहाची खरेदी होऊ लागली. कधी गोरेगावमधील आहुजामधून तर कधी जैन मंदिरासमोरच्या दोन होलसेलर्सकडून...
साधारण तेव्हाच कधीतरी नेस्कॅफेची जाहिरात टीव्हीवर पाहिलेली. आणि जुलाब झाले तर ब्लॅक कॉफी घ्यावी असा एक शोध लागला. त्यामुळे औषधाच्या निमित्ताने घरात कॉफीचा शिरकाव झाला.
चहा आता सवय झाली होती. त्यात इतकं प्रेमात पडणं वगैरे काय असं वाटायचं. त्यामुळे एकदा रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना बडीशेप घेतली तर दोघे तिघे मित्र आणि एक मैत्रीण वसकन ओरडले,
"गधड्या...अमृततुल्य चहाची चव घालवतोयस." मी हे काय वेडे लोक अशा नजरेने त्यांच्याकडे पाहिलं होतं. बारावीला नापास झालो आणि उनाड भटकायला लागलो. थोडेफार पैसै असलेले मित्र मिळाले
मग चटक लागली, ती गोरेगावच्या रत्नाच्या फिल्टर कॉफीची.... आणि नंतर रात्री तिथल्या कट्ट्यावर गप्पा ठोकताना सायकल कॉफीची.....
सकाळचा चहा एकदा झाला की मग दिवसभर कॉफी.... कॉफी म्हणजे साली हाय मेन्ट्नन्स गर्लफ्रेंड. चहा तीन रुपयात वगैरे मिळून जायचा....आणि बाय अॅंड लार्ज चहा इतका वाईट नसतो...पण कॉफी फक्त रत्नामध्ये. हे चोचले परवडण्याचं वयही नव्हतं आणि खिशात पैसेही नव्हते.
'महानगर' या वर्तमानपत्रामध्ये असताना पुन्हा एकदा चहाच्या प्रेमात पडलो. नाईट शिफ्टला दादर स्टेशनला जायचो...तिथे बबन चहावाला अप्रतिम चहा बनवायचा. बबनच्या चहामुळे एक वाईट झालं...बाकी कुठलाही चहा आवडेनासा झाला. अपवाद गोरेगाव येथील चौहानच्या टमटमचा. तो चहा हे एक अजब रसायन होतं आणि त्याची ऐट होती. कटिंग नाही...घ्यायचा तर अख्खा घ्या आणि रेग्युलर चहापेक्षा दोन रुपये जास्त. पण साली चव जीवघेणी होती.
मग जरा 'मिड डे' या इंग्रजी वर्तमान पत्रात काम वगैरे सुरू झालं आणि परत चहावरचं प्रेम निमालं... त्याला मुख्य कारण म्हणजे सरकारी ऑफिसमधे मिळणारा रद्दड चहा.
त्यापेक्षा गरम पाणी परवडलं इतका तो वाईट असतो. तर चहाचे प्रयोग फक्त घरी सुरू राहिले. ममरी ते केसरी ममरी ते हॉटेल डस्ट ते हॉटेल डस्ट मिक्स...असं करतकरत गाडी गेली ब्रॅंडेड चहावर.
तबलानवाज झाकिर हुसेनच्या जाहिराती पाहून घरी वाह ताज सुरू झालं. ऑफिसमधे चहा बंद होता जवळजवळ. बाहेर सावंतकाका म्हणून होते. तो कधीतरी मला आवडेलसा चहा बनवत. पण ते फार क्वचित
जरा पॉश ऑफिस झालं तसं ऑफिसमधे टी कॉफी व्हेंडिंग मशीन आलं. आणि माझं कॉफीवर पुन्हा प्रेम जडलं. चंचल जिव्हा आणि त्याहूनही चंचल मन. नेस्कॅफेचं मशीन होतं...वेगवेगळे फ्लेवर्स होते...मला कॅपुचिनो भावली. थोडीशी कडवट...माझ्यासारखी. पण एका कपात थकवा दूर करणारी. अशी ती फुकट कॉफी सॉलिड आवडली.
मग सकाळी एक कप चहा आणि ऑफिसमधे सहा कप कॉफी ढोसणं सुरू झालं. मग (अति) कॉफीबरोबर येणारे दुष्परिणाम आले. पण आता कॉफी हाय मेन्ट्नन्स गर्लफ्रेंड नव्हती. आता जरा खिशात पैसे खुळखुळायला लागले होते. मग कधीतरी बरिस्तामधे, कधी कॅफे कॉफी डे मधे कॉफी सुरू झाली. नवीन ऑफिसमधे तळाला स्टारबक्स कॉफी मिळू लागली. पण जी फिल्टर कॉफी रत्नामधे प्यायलो तिची सर येईना.
घरातला चहाचा ब्रॅंड मधल्या काळात बदलला होता. ताजवरून आम्ही सोसायटीकडे गेलो होतो. डायबेटीसमुळे त्यात दालचिनी टाकून घेऊ लागलो होतो. चहा हे आता औषध बनलं होतं. चांगला चहा दुर्मिळ झाला होता....
और फिर अपुनकी लाईफ में....हेमा आयी... कुणाच्या तरी गेलो होतो आणि चहाचा पहिला घुटका घेतल्याबरोबर वाह म्हणालो बायकोने ते बरोबर टिपलं आणि ब्रॅंड विचारून घेतला. ही अप्रतिम चव सोसायटीच्या नवा फ्लेवर मसाल्याची होती. या रविवारी आम्ही जेव्हा खरेदीला गेलो, तेव्हा बायकोने नेमकी ती चहा पावडर घेतली
फिर वही स्वाद, वही मजा, वही प्यार मन में जाग उठा... आणि चहाबरोबरची प्रेम-कहाणी पुन्हा सुरू झाली.