लेखक - दिग्दर्शंक - शीर्षक आनंद आणि शंतनू छिब्बर
कलाकार - नील नितीन मुकेश, सोनल चौहान, मृणालिनी शर्मा, अनीश कपूर
www.24taas.com, मुंबई
लेखक – दिग्दर्शक जोडी शीर्षक आनंद आणि शंतनू छिब्बर यांचा ‘थ्री जी’ हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट शुक्रवारी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय. या चित्रपटाची, आपल्या सध्याच्या ‘डे टू डे’ लाईफचा भाग बनलेल्या ‘थ्री जी’ कनेक्शन आणि मोबाईल फोनशी तुम्ही सांगड घालू शकाल. प्रेक्षकांच्या थोड्याफार अपेक्षा पूर्ण करण्यात हा सिनेमा यशस्वी झालाय असंही आपल्याला म्हणता येईल.
चित्रपटाची सुरुवात ठिकठाक
सुरुवातीला तुम्हाला हा सिनेमा खिळवून ठेवतो त्यामध्येच तुम्हाला आश्चर्याचा धक्काही बसतो. सुरुवातीलाच सोनल चौहान नामक कन्यका रेड बिकीनी परिधान करून समुद्राच्या पाण्यातून बाहेर येताना नजरेस पडते... त्यामुळे हे दृश्यं पाहताना पुरुष प्रेक्षकांना पापणीही बंद करायला जड जातं. शीना (सोनल) आणि सॅम (नील) हे दोघेही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी फिजी इथं दाखल झालेले आहे. जिथं पहिल्याच दिवशी सॅमचा मोबाईल हरवतो. त्यामुळे सॅमला एक सेकंड हॅन्ड मोबाईल विकत घ्यावा लागतो. या फोनमध्ये थ्री जी सुविधा उपलब्ध आहे. पण, हा फोन हातात आल्यानंतर सॅमच्या खऱ्या अडचणींना सुरुवात होते. त्याच्या मोबाईलवर एका अनोळखी तरुणीचे विविध व्हिडिओ येऊन धडकतात. ही तरुणी अडचणीत सापडलेली आहे आणि आपल्या मदतीसाठी ती सॅमला हाकारत असते.
नील आणि सोनम
नील आणि सोनमची जोडी पडद्यावर चांगली वाटते. दोघांमध्ये केमिस्ट्रीही चांगलीच जमलीय. काही दृश्यं बाजुला केली तर सोनलचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. पण, तरीही तिचा या सिनेमातील वावर प्रेक्षकांना आकर्षित करतो.
जेव्हा जेव्हा फोन वाजतो तेव्हा सॅममध्ये अचानक काहीतरी बदल होतात त्याला काही भास व्हायला लागता. नीलनं त्याच्या वेडपटपणाला आणि एका प्रेमळ प्रियकराच्या भूमिकेत स्वत:ला पडद्यावर चांगलंच प्रेझेंट केलंय. त्याचं रडणंही प्रेक्षकांना भावतं.
परंतू, एका वेळेपर्यंत प्रेक्षक या वेडपटपणाला सहन करू शकतात, पण त्यानंतर हे विचित्र संवाद कानांवर पडतात आणि बेअक्कल सीन्स जबरदस्तीनं पाहायला लागतात तेव्हा मात्र प्रेक्षक वैतागतो. सिनेमाच्या अर्ध्या भागात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सिनेमा पुढच्या अर्ध्या भागात मात्र प्रेक्षकांना ‘का आलो?’ असा स्वत:लाच प्रश्न विचारायला भाग पाडतो.
मृणालिनी शर्मा आणि अनीश कपूर यांच्या भूमिकाही पहिल्यांदा चांगल्या वाटतात पण शेवटी शेवटी प्रेक्षक त्यांनाही कंटाळतो. शेवट शेवटपर्यंत आता सिनेमा आपल्याला समजेल असं वाटणारा सिनेमा मधेच काही सीन्समध्ये आपण कलयुगात आहोत असं वाटायला लावतो.
काय कराल
शेवटी काय तर ‘थ्री जी’ तुम्ही एकदा बघायला जाऊ शकता. पण पुन्हा ट्राय करू नका... नव्हे, तुम्हीच तो पुन्हा ट्राय करणार नाहीत. ‘फिजी’च्या पर्यटनाचा आनंद मात्र या चित्रपटातून तुम्ही घेऊ शकता किंबहुना फिजीची ही जाहीरात आहे की काय? असाही प्रश्न तुम्हाल बऱ्याचदा पडतो. जर तुमच्याकडे करण्यासारखं अगदीच काही नसेल तरच चित्रपटगृहात जा! सुज्ञास अधिक सांगणे न लागे...