www.24taas.com,हैदराबाद
पहिल्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला आहे. आर.अश्विनच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताविरुद्धच्या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या १५९ धावांमध्ये संपुष्टात आला. अश्विनने ३१ धावांमध्ये ६ गडी बाद केले.
कसोटीच्या दुस-या दिवशीचा खेळ संपताना न्यूझीलंडने ५ गडी गमावले होते, आज तिस-या दिवसाचा खेळ सुरू केल्यानंतर अवघ्या तीन तासांत त्यांनी ५ गडी गमावले. फ्रँकलिनने ४३ धावा करत न्यूझीलंडची पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तळाचे फलंदाज झटपट तंबूत परतल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. भारतातर्फे आर. अश्विनने ६, ओझाने ३ आणि यादवने १ बळी टिपला.
चेतेश्वर पुजाराच्या दीड शतकी खेळीनंतर रवीचंद्रन आश्विन आणि प्राज्ञान ओझा यांच्या जादूई फिरकीने न्यूझीलंडची तारांबळ उडाली. भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांना उत्तर देणार्या पाहुण्या संघाने दुसर्या दिवशीचा खेळ थांबला, तेव्हा ५ गडी गमावून केवळ १०६ धावा केल्या होत्या. ३३२ धावांनी अद्याप पिछाडीवर असलेल्या न्यूझीलंडसमोर फॉलोऑनचे संकट आहे.
खराब हवामानामुळे २६ मिनिटे खेळ उशिरा सुरू झाला. भारताने कालच्या ५ बाद ३०७ वरून पुढे खेळ सुरू केला. पुजाराने १५९ आणि कर्णधार धोनीने ७३ धावा करीत सहाव्या गड्यासाठी १२७ धावांची दमदार भागीदारी केली. यानंतर आश्विन, ओझाच्या तालावर न्यूझीलंडचे फलंदाज नाचले. आश्विनने तीन तर ओझाने दोन फलंदाजांना तंबूची वाट दाखविली. ढगाळ वातावरणाचा लाभ घेत या दोघांनी ५५ धावांत न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना बाद केले.