रांगोळीच्या रंगांची शिकवण...

घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही... तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.

Updated: Nov 2, 2012, 04:53 PM IST

www.24taas.com,मुंबई
सणासुदीचे दिवस सुरू झालेत... दसरा-दिवाळीत तर काय करू आणि काय नको? असं होऊन जातं. दरवाजाच्या चौकटीपासून ते रांगोळीपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या मनाला हव्या तशा सजवण्यात आपला किती वेळ खर्ची जात असेल ना! पण, हे सगळं करून स्वत:ला आणि आपल्या कुटुंबीयांना खूश करण्यातला आनंद काही औरच... दिवाळी आहे आणि आपल्या घराचा दरवाजा रांगोळीनं सजला नाही, असं तर होणंच शक्य नाही. पण, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की आपल्या सणांच्या दिवसात रांगोळीचं एवढं महत्त्व का आहे?
तसं पाहायला गेलं तर भारतातील प्रत्येक सणांत आणि त्यांच्या परंपरेमध्ये एक गर्भित अर्थ आहे. तसंच रांगोळीचंदेखील आहे... पण, घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही... तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.
रांगोळी म्हणजे भूमी-अलंकरण... भूमीला सजविण्यासाठी, देवघरातील देव्हारा, अंगण, भोजनाची पंगत, शुभकार्यस्थळ इत्यादी जागा सुशोभित करण्यासाठी रांगोळी, तांदळाची पिठी, खडू, शिरगोळ्याचे किंवा संगमरवराचा भुकटी, चुन्याची भुकटी, भाताच्या तुसाची जाळून केलेली राख, मीठ, पानं, विविध धान्ये अशा विविध गोष्टींनी रांगोळी काढली जाते. आणि त्यात वेगवेगळे रंग भरून ती सुशोभित केली जाते. आपल्या जीवनही अशाच वेगवेगळ्या रंगांनी रंगलेलं असावं, ही त्यामगची इच्छा आणि मागणी. धार्मिक, सांस्कृतिक समारंभ प्रसंगी, शुभकार्य प्रसंगी घरासमोर, अंगणात, उंबऱ्यावर, देवघरासमोर, चौरंग वा पाटाभोवती रांगोळी रेखाटली जाते. पूजापाठ, यज्ञ, अभ्यंगस्नान, औक्षण, नामकरण, भोजन अशा सर्व प्रसंगी सर्वप्रथम रांगोळी काढणे भारतात सर्वत्र प्रचलित आहे.
आता समजलं का... सणांच्या दिवसांत रांगोळी का महत्त्वाची आहे ते... मग, आता जेव्हा तुम्ही या दिवाळीमध्ये आपल्या घरासमोर बसून रांगोळी रेखाटत असाल तेव्हा हे लक्षात असू द्या की तुम्ही फक्त घराची सजावट करत नाही तर तुम्ही तुमच्या संपूर्ण घराला आणि कुटुंबीयांना एका सकारात्मक ऊर्जेमध्ये घेऊन जाताय. शिवाय यासाठी तुम्ही रासायनिक रंगांचा वापर न करता प्राकृतिक रंगांचा जेवढा जास्त वापर कराल तेवढं चांगलं... कारण हे रासायनिक रंग तुमच्या त्वचेला हानिकारकही असतात.