मुंबई : मोबाईल म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक झाला आहे , त्यामुळे बहुतेक जण सतत मोबाईल मध्ये व्यस्त असतात , यात तरुणाई चा पुढाकार जास्त असतो तर परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी मोबाइल वापरल्यास पालकांची नेहमीच चीडचीड होते. मात्र, याच मोबाइलवरून विद्यार्थी परीक्षा देत असतील तर?
परीक्षा सुरु आहे आणि सर्व मुले मोबाईलवर व्यस्त आहेत, हा प्रकार आपल्याना नवीन आहे. पण असं झालंय ते सोमय्या महाविद्यालयात. महाविद्यालयात चक्क परीक्षाच मोबाईलच्या माध्यमातून घेण्यात आली. विविध शाखेतील तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी आपली २० गुणांची अंतर्गत परीक्षा मोबाईलवरून दिली.
'ऑफी मशीन'च्या मदतीने ही परीक्षा घेण्यात आली आहे. ही परीक्षा देताना स्मार्ट फोनची आवश्यकता असून मोबाईलवर इंटरनेटची गरज नसते. हॉट स्पॉटवरून विद्यार्थी लॉगीन करून आपली प्रश्नपत्रिका सोडवू शकतात. एका विद्यार्थ्याला आलेला प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्याला येत नाही. दिलेल्या वेळेत परीक्षा पूर्ण झाल्या नंतर लगेचच विद्यार्थ्यांना आपला निकालही समजला आहे
परीक्षा पद्धतीत बदल आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रशासनाने यंदापासून विद्यार्थ्यांची परीक्षा मोबाइलवर घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नांना दिलेली उत्तरेही समजत असल्यामुळे पुनर्मूल्यांकनाचाही प्रश्न येत नाही. या उपक्रमासाठी सोमय्याचा माजी विद्यार्थी अमित शहा याने ‘ऑफी’ तंत्रज्ञान तयार केले आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने विद्यार्थ्याना नोटीस आणि शिक्षणास उपयोगी फिल्म बघता येणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही फायदा होणार असून, नियमित अभ्यासक्रम शिकवण्यासाठीही ते वापरता येईल.
भारतात डीजिटल क्रान्ती घडत असतानाच विद्यार्थ्यानाही आभ्यासात आवड निर्माण होऊन परीक्षा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ऑफिचा वापर होणार आहे. मुंबईप्रमाणे जर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात देखील या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला तर यामुळे कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरण संवर्धन होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.