www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलक शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. कला-क्रिडा शिक्षकांनी हे आंदोलन केलं होतं. अन्य शिक्षकांप्रमाणेच वेतन मिळावं, अशी मागणी करत या शिक्षकांनी हे आंदोलन केलंय.
रस्त्यावरून लोळत जात या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. परंतू आक्रमक पवित्रा घेताक्षणी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. गेल्या ११ दिवसांपासून या शिक्षकांचं शांततापूर्वक आंदोलन सुरू होतं. परंतू त्यांच्या आंदोलनाची आणि नाराजीची सरकारकडून कोणत्याही पद्धतीची दखल न घेतली गेल्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, असं आंदोलकांनी म्हटलंय. किमान पाच हजार मानधन मिळावं, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.
या घटनेत काही शिक्षक जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय. गेल्या ११ दिवसांच्या आंदोलनाचा हा उद्रेक आहे, असं म्हटलं जातंय.