www.24taas.com,सांगली
काबाडकष्ट करून पिकवलेल्या उसाला चांगला भाव मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलेल्या चंद्रकांत नलावडे या शेतक-याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला. पैसा आला की घरात थोडी खरेदी करता येईल, पोरांना चार कपडे घेता येतील, असं स्वप्न रंगवणारं चंद्रकांतचं कुटुंबं पोरकं झालंय.
सांगली जिल्ह्यात ऊसदराचं आंदोलन पेटलं. सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यात अवघ्या ३१ वर्षांचा चंद्रकांत शिवाजी नलावडे मृत्युमुखी पडला. चंद्रकांत हा मुळचा मिरज तालुक्यातील बेडग इथला. रोजगाराच्या निमित्तानं ते वसगडे इथं आला आणि एक एकर जमीन कसण्यासाठी खंडानं घेतली.
चंद्रकांत आणि त्यांची पत्नी सारिका काबाडकष्ट करून शेती करत. यंदा त्यांनी ऊस लावला होता. त्याला चांगला भाव येईल, तर आयुष्य थोडं सुखाचं होईल, हे चंद्रकांतचं स्वप्न होतं. मात्र, आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्याचे स्वप्न बंदुकीच्या एका गोळीनं साफ चुरगळून टाकलंय.
चंद्रकांत यांच्या मृत्यूची बातमी समजताच सारिकानं एकच हंबरडा फोडला. तिच्या आशांचा एका क्षणात चुराडा झाला. चंद्रकांत तर गेला. पण आता अवघ्या पाच वर्षांचा आदित्य आणि त्याची छोटी बहीण आकांक्षा यांचं पालनपोषण कसं करायचं, हा प्रश्न सारिकासमोर आ वासून उभा आहे. जिल्हाचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी नलावडे कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं चंद्रकांत यांचे बंधू बाळासाहेब यांनी सांगितलं.
चंद्रकांतच्या या अकस्मात जाण्यानं गावक-यांनाही धक्का बसलाय. गावावर ऐन दिवाळीत स्मशानकळा पसरलीये. नलावडे कुटुंबियांचं दुःख सगळ्या गावानंच वाटून घेतलंय. अत्यंत शोकाकुल वातावरणात चंद्रकांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पतंगराव कदम यांनी आश्वासन तर दिलं, पण ते पाळलं जाणार का आणि मुख्य म्हणजे नलावडे कुटुंबाला खरोखर आधार मिळेल इतकी मदत केली जाणार का, याचं उत्तर नजिकच्या काळात मिळणार आहे. तोपर्यंत वाट पाहावी लागणार.