www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कधी काळी निव्वळ रबर स्टॅम्प अशी निवडणूक आयोगाची हेटाळणी केली जायची. पण आयोगानं आपली ताकद दाखवून दिली ती टी.एन. शेषन यांच्या काळात... शेषन यांनी निवडणूक आयोग म्हणजे रबर स्टॅम्प नव्हे, तर दरारा असलेला सिंह असल्याचं दाखवून दिलं... पण काळाच्या ओघात राजकीय नेते आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला रबर स्टॅम्प समजू लागलेत की काय... असा प्रश्न आता निर्माण झालाय.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक छोटे-बडे नेते वादग्रस्त विधानं करतायत. नेत्यांच्या या वायफळ बडबडीला निवडणूक आयोग चाप लावू शकत नाहीय की, कारवाई देखील करत नाहीय. आयोग फार फार तर नोटीस देईल, अथवा खुलासा मागवेल, असाच राजकीय नेत्यांचा समज झालाय.
केंद्रीय मंत्री शरद पवारांनी दोनदा मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यावरून वाद झाल्यानंतर पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आयोगानंही त्यावर पडदा टाकला. वादग्रस्त वक्तव्य केलं तरी कडक कारवाई होत नसल्यानं निवडणूक प्रचारातील भाषेची पातळी आणखीच घसरू लागलीय.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिलं होतं. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या अधिका-यांच्या बदल्या केल्यानं ममता नाराज झाल्या होत्या. आयोगाच्या निर्णयापुढं त्यांना अखेर झुकावं लागलं असलं तरी आयोगाशी दोन हात करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. टी. एन. शेषन यांच्या काळात निवडणूक आयोगाचा जो दरारा होता, तो आता राहिलेला नाही, हेच यावरून स्पष्ट दिसतंय. शेषन यांच्यासारखा खमका अधिकारी नंतर होऊ शकलेला नाही. त्यामुळं निवडणूक आयोगाचं अस्तित्व सध्या तरी कागदावरच उरलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.