www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मतदानापूर्वी आणि मतदानानंतरही चुरशीची वाटलेली पुण्यातील लढत प्रत्यक्षात एकतर्फी ठरली. भाजपच्या अनिल शिरोळेनी काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचा दारूण पराभव केला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरलेल्या पुण्याच्या निकालाचं विश्लेषण करणारा विशेष रिपोर्ट
पुण्यातल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारानं विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवलाय. अनिल शिरोळे यांना ५,६९,८२५ मतं पडली, तर २,५४,०५६ मतं घेऊन विश्वजीत कदम दुसऱ्या स्थानावर राहिले. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयी उमेदवाराला इतकी मतं मिळाली. ३,१५७६९ एवढं मोठं मताधिक्य घेणारे शिरोळे पहिलेच उमेदवार ठरले.
काँग्रेसमध्ये कुठलीही फुट अथवा बंडखोरी नसताना भाजपनं विजय मिळवला. पुण्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने आघाडी घेतली. वडगाव शेरी, क्यांटोन्मेन्ट आणि शिवाजीनगर मतदार संघात यापूर्वी भाजपला कधीच आघाडी मिळाली नव्हती.
विश्वजीत कदम हे नव्या दमाचे उमेदवार असल्याचं सांगत त्यांना निवडून आणण्यासाठी शरद पवारांसह राष्ट्रवादीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही.
पुण्यामध्ये अनिल शिरोळेचा विजय आणि विश्वजित कदमांचा पराभव यामागील १० सामायिक कारणं काय आहेत ते पाहूया....
देशात उसळलेली मोदी लाट- पुणं याला अपवाद ठरलं नाही. पुण्यामध्ये मोदींची निवडणुकीच्या दरम्यान तसेच त्यापूर्वी झालेल्या सभा; तसेच अनेक खासगी कार्यक्रमांनी अनिल शिरोळेचं बळ वाढवलं
काँग्रेस मधील पक्षांतर्गत निष्क्रियता : पक्षातील नाराज नेत्यांशी संबंधित हा विषय आहे. उमेदवारी मिळाली म्हणून नाराज झालेले आमदार विनायक निम्हण असो वा मोठ्या संख्येनं असलेले कलमाडी समर्थक, या आणि अशा लोकांनी विश्वजीत कदमांसाठी कितपत काम केलं याबद्दल शंकाच आहे.
बाहेरचा उमेदवार : सुरुवातीपासून बसलेला बाहेरचा उमेदवार हा शिक्का विश्वजीत कदम शेवट पर्यंत पुसू शकले नाहीत. काँग्रेसमधील अनेकांसह पुणेकरांनीही त्यांना बाहेरचा ठरवत बाहेरचा रस्ता दाखवला
उमेदवाराची प्रतिमा : विश्वजीत कदम यांची ओळख शिक्षण सम्राट अशीच आहे. जी एक प्रकारे नकारात्मक ठरली. त्यातच पतंगराव कदमांचे पुत्र,बिल्डर अविनाश भोसलेंचे जावई ही नाती त्यांचा संबंध निव्वळ सत्ता आणि संपत्तीशी जोडणारी ठरली. त्याचा परिणाम नकारात्मक झाला. याउलट संघ स्वयंसेवक, पतित पावन संघटनेची पार्श्वभूमी यामुळे शिरोळेना पुणेकरांची पसंती मिळाली.
उमेद्वारावरील आरोप प्रत्यारोप आणि नकारात्मक प्रसिद्धी : पुण्यामध्ये विश्वजीत कदम हेच सर्वाधिक आरोपांचे लक्ष ठरले. मतदार यादीतल्या घोळामुळे विश्वजीत कदमांची होता होईस्तो नकारात्मकच प्रसिद्धी झाली. भाजपचे अनिल शिरोळे अशा आरोपांपासून सुरक्षित राहिले.
मनसे आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांची मतं सव्वा लाखाच्या पुढे गेली नाहीत. परिणामी भाजपच्या मतविभागणीचा फायदा काँग्रेसला झाला नाही
विश्वासाचा अभाव - काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे पक्षातील इतर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाची भावना निर्माण करू शकले नाहीत.
भाजपला मिळालेली संघ तसेच आरपीआय ची ताकद : संघाच्या अथवा संघाशी संबंधित घरांमध्ये शत प्रतिशत मतदान घडवून आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले.
त्याच प्रमाणे मागील लोकसभा निवडणुकीत पक्षासोबत नसलेली आरपीआय यावेळी महायुतीचा भाग होती. त्याचा निश्चितच लाभ भाजपच्या उमेदवाराला झाला.
नवमतदारांचे मतदान : पुण्यात गेल्या वेळी ४०. ६६ % मतदान झालं होतं. यावेळी ते ५४ टक्के झालं. हे १४ टक्के वाढीव मतदान प्रामुख्यानं तरुणाचं आहे. त्यातील बहुतांश मतदान भाजपच्या पारड्यात पडल्याचं म्हणता येईल
परंपरेला छेद : पुण्यामध्ये अमुक एका पक्षाची इतकी मतं आहेत, अमुक एका समुहाची, जातीची किंवा धर्माची इतकी मतं आहेत, अमुक एका नेत्याची इतकी मतं आहेत, अमुक एक उमेदवार इतका पैसा खर्च करतोय, या आणि अशा गोष्टींवर आधारित राजकारण बाजूला ठेवत पुणेकर मतदारांनी नवीन विचार स्वीकारला. याचा लाभ अनिल शिरोळेना झाला.
काँग्रेसचा बालेकिल्ला पार उद्ध्वस्त करत भाजपानं विजय मिळवलाय. पुणेकरांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलय. आता पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी नवनियुक्त खासदारावर आहे.