मेंदीच्या पानावर... त्वचारोग दडले गं!

हातांची शोभा वाढवण्यासाठी तसंच केसांना चकचकीत ठेवण्यासाठी मेहंदी सर्रास वापरली जाते. पण, याच मेहंदीचे काही दुष्परीणामही आहेत... हे दुष्परिणाम काय आहेत आणि आपण ते कसे दूर ठेवू शकतो, हे आज आम्ही तुम्हाला सांगतोय. 

Updated: Oct 1, 2015, 04:19 PM IST
मेंदीच्या पानावर... त्वचारोग दडले गं! title=

मुंबई : हातांची शोभा वाढवण्यासाठी तसंच केसांना चकचकीत ठेवण्यासाठी मेहंदी सर्रास वापरली जाते. पण, याच मेहंदीचे काही दुष्परीणामही आहेत... हे दुष्परिणाम काय आहेत आणि आपण ते कसे दूर ठेवू शकतो, हे आज आम्ही तुम्हाला सांगतोय. 

शुद्ध हिरव्या रंगाची मेहंदी लावल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. संवेदनशील त्वचा असणाऱ्या काही लोकांचा याला अपवाद असू शकतो. याउलट काळ्या किंवा तपकिरी रंगाची मेहंदी लावणं हानीकारक ठरू शकतं. 

पाहुयात, मेहंदीचे दुष्परिणाम...
त्वचारोग
मेहंदी जरी नैसर्गिकरित्या मिळत असली तरी, काही वेळा कमी कालावधीमध्ये अधिक गडद रंगण्यासाठी तिच्यात PPD (पॅरा-फेनिलीनडायअमाइन) मिसळतात. बऱ्याच जणांना हे माहीत नसते की, PPD त्वचेच्या संपर्कात आल्यानं खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे असे त्रास जाणवू शकतात. 

केसांना शुष्कता
केसांना लावण्याची मेहंदी तयार करताना त्यामध्ये अनेक घातक रासायनिक घटक मिसळल्यामुळे केस शुष्क होतात. तसेच डोक्याला खाज सुटते, कधीकधी पुरळही येऊ शकतात. 

डोळे लाल होतात
मेहंदीचा डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळे लाल होतात किंवा डोळ्यांतून पाणी येऊ लागते. अशा वेळी थंड पाण्याने डोळे धुवावेत व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लाल पेशी फुटणे 
ज्या मुलांना G6PD ची (6 ग्लुकोज फॉस्पेट डिहायड्रोजनेजची) कमतरता असेल त्यांच्या हातांना मेहंदी लावू नये. नाहीतर त्यांच्या शरीरातील लाल पेशी फुटून शारिरीक समस्या निर्माण होतील. असे काही झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पोट बिघडणे
कोणत्याही स्वरुपातील मेहंदी पोटात जाणे मानवी आरोग्यासाठी घातक असते. चुकूनही थोडी फार मेहंदी पोटात गेली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मेहंदीचे दुष्परिणाम टाळण्यसाठी काय करता येईल... 

  • कधीही हातांना किंवा केसांना मेहंदी लावण्याअगोदर पॅच टेस्ट करावी.

  • मेहंदीमधील रासायनिक घटकांमुळे केस शुष्क न होण्यासाठी मेहंदी लावण्याआधी केसांना तेल लावावं

  • मेहंदी लावल्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनरचा (शक्यतो आयुर्वेदिक) वापर करून केस स्वच्छ धुवावेत

  • मेहंदी लावल्यानंतर खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे अशी लक्षणे आढळल्यास लगेचच हात किंवा केस धुवून त्यावर Allegra किंवा Avil यांसारखे अॅलर्जी कमी करणारे औषध लावावे

  • यांसारखी लक्षणे आढळल्यास घरीच कोणतेही तेल किंवा क्रिम न लावता त्वरित त्वचा रोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.