www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बिहारच्या बोधगयास्थित महाबोधी मंदिरात रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेनं स्विकारलीय. सोबतच आता आपलं ‘पुढचं टार्गेट मुंबई असेल’ अशी चेतावणीही या संघटनेनं दिलीय. आता या बॉम्बस्फोटाच्या तपासाची पुढची जबाबदारी ‘राष्ट्रीय चौकशी समिती’कडे (एनआयए) सोपवण्यात आलीय.
इंडियन मुजाहिद्दीननं बोधगयामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारत असल्याचं ट्विटर या सोशल वेबसाईटवर उघडपणे सांगितलंय. महत्त्वाचं म्हणजे, बोधगयामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच ६ जुलै रोजी ट्विटवरवरून मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. आता, एनआयएसहित अन्य चौकशी एजन्सीज आता या ट्विटर अकाऊंटच्या माहितीच्या मागे लागल्यात.
बोधगयाच्या बॉम्बस्फोटांना १२ तास उलटून गेल्यानंतर ‘आयएम’च्या ट्विटर अकाउंटवर आपलं पुढचं टार्गेट मुंबई असल्याची धमकी दिली गेलीय. ‘नऊ बॉम्बस्फोट आम्ही घडवून आणलेत’ असं ट्विट आयएमच्या ट्विटर अकाउंटवर केलं गेलंय. यामध्ये ठिकाणांचा उल्लेख मात्र नव्हता. तर या बॉम्बस्फोटांच्या अगोदरच्या दिवशी याच अकाउंटवर ट्विट केलं होतं... ‘आमचं पुढचं टार्गेट असेल मुंबई... थांबवता आलं तर थांबवा, केवळ सात दिवस उरलेत’. या अकाऊंटवर हे ट्विट कॅनाडाहून करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी चार जणांना ताब्यात घेतलंय. या चौघांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. या चौघांना मंदिर परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ताब्यात घेण्यात आलंय. या चौघे रविवारी सकाळी संशयित पद्धतीनं मंदिरात फिरताना सीसीटीव्हीमध्ये आढळले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.