नवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड बंदीप्रकरणी तोडगा दृष्टीपथात आहे. लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर लगेच बंदी उठण्याची शक्यता आहे. मात्र, तोडगा निघाला नाही, तर NDA बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांनी घातलेल्या प्रवासबंदीवरून शिवसेना आक्रमक झाली आहे. रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदी उठवली नाही तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या शिवसेनेने आता सरकारलाच थेट इशारा दिला आहे.
येत्या १० एप्रिलपर्यंत या मुद्द्यावर तोडगा काढला नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) च्या बैठकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या नेत्यांना चुकीच्या पद्धतीने ‘टार्गेट’ केले जात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
बलात्कारी, दहशतवादी, इतकेच काय तर काश्मिरी फुटीरतावादीही विमानाने प्रवास करू शकतात; मग गायकवाड का नाही, असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्याचेही राऊत यांनी सांगितले.
यावेळी या प्रकरणामागे कोण आहे, हे लवकरच आम्ही जगासमोर आणू, असेही राऊत यांनी सांगितले. विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्या उद्योगपतीला या विमान कंपन्या ‘स्पेशल ट्रीटमेंट’ देतात, असा हल्लाबोल राऊत यांनी चढवला.
दरम्यान, खासदार रवींद्र गायकवाडांच्या हवाईबंदी प्रकरणावर तोडगा दृष्टीपथात आलाय. गायकवाड लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता आहे. यात पुन्हा असं वर्तन होणार नाही, असं आश्वासन ते देतील. त्यानंतर लगेच त्यांच्यावरची बंदी मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.
आज लोकसभेत यावरून गोंधळ झाला. कामकाज तहकूब झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांसोबत शिवसेनेचे मंत्री अनंत गिते, खासदार आनंदराव अडसूळ, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू हे उपस्थित होते. यावेळी अनंत गिते आणि हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांच्यात झटापटही झाली.
तत्पुर्वी मारहाण प्रकरणी गायकवाडांनी लोकसभेत निवेदन करून स्पष्टीकरण दिले. तर रवींद्र गायकवाडांवरची बंदी मागे घेण्यात आली नाही, तर NDA बैठकीला न जाण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.