www.24taas.com , वृत्तसंस्था, श्रीनगर
काश्मीर शहरातील सौरामधील अहमदनगर भागत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच पोलीस जखमी झाले आहेत. या भागात अतिरेकी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या भागाला घेरले. याचवेळी अतिरेक्यांनी बॉम्बहल्ला केला.
तर ताबारेषेवरील केरन क्षेत्रात पाकिस्तानने ३० ते ४० दहशतवादी घुसवले असून भारतीय लष्कराचा त्यांच्याशी तीव्र संघर्ष सुरू होता. कुपवाडा परिसरात २३ डिसेंबरपासून या परिसरात संघर्ष सुरूच आहे. तर श्रीनगरमध्ये गेल्या २४ सप्टेंबरपासून घुसखोरांना हुडकून काढण्याची मोहीम सुरू आहे.
दरम्यान, या घुसखोरांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे विशेष पथकही असल्याचा संशय आहे. मात्र, त्याविषयी आताच सांगणे घाईचे ठरेल, असे लष्करी अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लपलेले अतिरेकी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ नये म्हणून संपूर्ण परिसरात मोठ्याप्रमात लष्करी सैन्य तैनात करण्यात आले आहे. हे अतिरेकी लष्कर ए तैय्यबाची असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
केरन क्षेत्रातील घुसखोरीची गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी कराराचा पुन्हा एकदा भंग करत बुधवारी पूँछ जिल्ह्यातील ताबारेषेवर गोळीबार केल्याची माहिती संरक्षण प्रवक्त्याने दिली. मेंढार येथील भारतीय हद्दीत पाकने गोळीबार केला असून त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.