www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काल सीबीआयने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरुन सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले. सीबीआयने स्वायत्तता गमावली असून तो सरकारी पोपट झाला असल्याची टीका सर्वोच्च न्यायालयाने केली.
सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे हे केंद्र सरकारने गांभिर्याने घेतले असून त्यामुळे आज राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. कायदामंत्री अश्वनीकुमार यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली. त्याआधी ऍटर्नी जनरल वाहनवती यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली.
काँग्रेसकडूनच आता कायदामंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पंतप्रधानांवर दबाव वाढतोय. पंतप्रधानांनी कायदामंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे अश्वनीकुमार यांची खुर्ची संकटात सापडल्याची चर्चा आहे. दरम्यान अश्वनीकुमार यांनी मात्र आपण पंतप्रधांना भेटलो नसल्याचा दावा केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.