नवी दिल्ली : भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी विरोधात हा खटला चालणार असून त्यांच्यावर कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीं, मुरली मनोहर जोशी , विद्यमान केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह १२ जणांवर बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. याप्रकरणी कल्याण सिंह यांना मात्र दिलासा देण्यात आलाय.
कल्याण सिंह जोपर्यंत राज्यपालपदी आहेत. तोवर खटला फौजदारी खटला चालवता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. त्याचप्रमाणे दिवगंत झाल्यानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरही खटला चालवता येणार नाही असं कोर्टानं म्हटले आहे.
याप्रकरणाची सुनावणी सुरू होऊन 25 वर्ष उलटली आहेत. त्यामुळे आता पुढच्या 2 वर्षात सुनावणी पूर्ण करावी असाही आदेश सर्वोच्च न्यायायलयानं दिला आहे. सध्या बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी रायबरेली आणि लखनौमध्ये दोन खटले सुरू आहेत. त्यापैकी रायबरेलीतल्या खटल्यात आता बाबरी मशीद पाडल्याचा कट रचल्याचा अडवाणींसह १२ जणांवर आरोप आहे.