बीजिंग : चीननं आपल्या देशवासियांना इस्लामचं अनुकरण न करण्याचा सल्ला दिलाय. केवळ मार्क्सवादी विचारधारेचंच अनुकरण करायला हवं, असा सल्ला खुद्द राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना दिलाय.
नुकत्याच, झालेल्या धर्म संमेलनात कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे जनरल सेक्रेटरी आणि राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनच्या स्टेट पॉलिसी 'मार्क्सवादी नास्तिकते'चं अनुकरण करण्याचा सल्ला देतानाच इस्लामी विचारधारेचं अनुसरण न करण्याचा सल्ला दिलाय.
चीननं हा सल्ला खासकरून मुस्लिम बहुल शिनजियांग प्रांतातील लोकांना दिलाय. या भागात उइगर समुदायाचे लोक राहतात... सध्या या समुदायाचा चीन सरकारला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढतंच चाललाय. या समुदायाचा एक भाग कट्टरपंथाकडे वाटचाल करताना दिसतोय... आणि चीनी सरकारला या गंभीर स्थितीचा अंदाजा येतोय.
पाकिस्तानात मात्र चीनच्या या धोरणाचा जोरदार विरोध होतोय. शिनजियांची सीमा पाकिस्तानाला लागून आहे. इथूनच कट्टरपंथी इस्लामी शिक्षणाचा प्रसार होतो. याला चीनचा जोरदार विरोध आहे. त्यामुळेच, या धार्मिक संमेलनात जिनपिंग यांनी पाकिस्तानलाही एक संदेश दिल्याचं मानलं जातंय.
शिनजियांग प्रांतात दाढी वाढवणं, रमजानमध्ये रोजा ठेवणं, हिजाब परिधान करणं, हलाल मांस खाणं आणि दिवसांतून पाच वेळा नमाज वाचणं यांसारख्या इस्लामिक मान्यता आहेत. या सगळ्या गोष्टी 'अॅन्ट-स्टेट' असल्याचं समजलं जातंय. त्यामुळे, या सगळ्यावर बंदी आणण्याच अधिकार आहे. कट्टरपंथी देशासाठी धोकादायक ठरू शकतात, असं चीनी सरकारला वाटतंय.