www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी तयारीत असलेल्या ‘आम आदमी पार्टी’ला काँग्रेसकडून दिल्या गेलेल्या पाठिंब्यावर आता पक्षातच फूट पडताना दिसतेय. ‘सत्ता स्थापनेसाठी आपला पाठिंबा देण्याचा निर्णय कदाचित योग्य नाही, असा विचार काँग्रेसमध्ये सध्या सुरू आहे’ असं काँग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी मंगळवारी म्हटलंय.
द्विवेदी यांच्या म्हणण्यानुसार, पक्षातील अनेक नेत्यांना ‘आप’ला पाठिंबा देण्याचा निर्णय योग्य वाटतोय परंतु पक्षातील काही नेते आत्मचिंतनात आहेत. परंतु, काँग्रेसनं ‘आप’ला समर्थन जाहीर केलंय... त्यामुळे आम्ही हा निर्णय परत घेणार नाही. आम्हाला हा प्रस्ताव आता पूर्णत्वास न्यावा लागेल. परंतु, तरीही पक्षातील एक मोठा भाग या निर्णयाच्या विरोधात आहे.
यावरून पक्षात दुफळी निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसून येतंय. मंगळवारी, काँग्रेस समर्थकांनी ‘आप’ला जाहीर केलेल्या समर्थानाला विरोध करत ‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांचा पुतळाही जाळला.
‘जनतेनं नोंदवलेला कौल हा काँग्रेससाठी नव्हता. आम्ही विरोधी पक्षात बसायला हवं होतं... आणि जनतेचे प्रश्न उचलून धरायला हवे होते. या मुद्द्यावर काँग्रेसला मधला मार्ग काढायला हवा’ असंही द्विवेदी यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.