भोपाळ: शांततेचं नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालमनावर वाईट परिणाम होतो आणि त्यांचं भवितव्य खराब होतंय, असं म्हटलं. यावर सेन्सॉर बोर्डानं लगाम लावण्याची गरज असल्याचंही सत्यार्थी म्हणाले.
मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांनी राजभवनात सत्यार्थी यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात ते बोलत होते. सत्यार्थी म्हणाले, "चित्रपटांमध्ये आज जितक्या मोठ्या प्रमाणात अश्लिलता दाखवली जातेय, त्यावर सेन्सॉर बोर्डानं लगाम लावायला हवा."
त्यांनी सांगितलं, "मी भारतीय आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय राहिल." सोबतच मुलांना शिक्षण, संरक्षण आणि सन्मान देणं आणि त्यांच्यावर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी संपूर्ण समर्पित भावानं काम करत राणार. या निमित्तानं राज्यपाल राम नरेश यादव यांनी सांगितलं की, "माणूस आणि गरीब नारायणाची सेवा करणं मोठं पुण्याचं कार्य आहे. यापेक्षाही मोठं पुण्याचं आणि सेवेचं काम म्हणजे मुली आणि लहान मुलांचं जीवन सुखाचं आणि उज्ज्वल बनवणं आहे. कैलाश सत्यार्थी यांनी महात्मा गांधी आणि सम्राट अशोक यांचे आदर्श, सत्य आणि अहिंसाच्या मार्गावर चालून बालपण वाचविण्याचं जे कार्य केलंय ते आदर्श आहे." राज्यपाल यादव यांनी सत्यार्थींना प्रशस्ती पत्र भेट देऊन सन्मानित केलं.
राज्यपाल यादव यांनी सांगितलं की, बालपण वाचविण्याची जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवणाऱ्या सत्यार्थी यांच्यामुळे मध्य प्रदेशनं एकदा पुन्हा जगाच्या पाठीवर आपली सामाजिक प्रतिबद्धता सिद्ध केलीय.
सत्यार्थी यांचं जन्मगाव मध्य प्रदेशचा विदिशा जिल्हा आहे. सध्या ते आपल्या जन्मगावी आलेत. जागोजागी त्यांचा सन्मान होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.