नवी दिल्ली : तब्बल ४०० रूपयांना मिळणारे एलईडी (LED)बल्ब केंद्र सरकार फक्त १० रूपयांत उपलब्ध करून देणार आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
ऊर्जा बचत करणारा एलईडी बल्ब असला तरी फारसा लोकप्रिय नसलेले बल्ब प्रत्येक कुटुंबासाठी फक्त दहा रूपयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. केंद्राच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी आणि एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे.
एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातल्या चार ऊर्जा कंपन्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. बीईई आणि एनर्जी एफिशियन्सी सर्विसेस लिमिटेड संयुक्तपणे विज वितरण कंपन्यांच्या सहकार्याने खुल्या बाजारातून एलईडी बल्बची खरेदी करून प्रत्येक वीज ग्राहक कुटुंबांमध्ये प्रत्येकी दहा रूपयांना एक या दराने विक्री करणार आहेत.
गेल्याच आठवड्यात या उपक्रमातील एक पथदर्शी प्रकल्प म्हणून आंध्र प्रदेश सरकार आणि एनर्जी एफिशियन्सी सर्विसेस लिमिटेडने केलेल्या सांमजस्य करारानुसार, खुल्या बाजारातून तब्बल २० लाख एलईडी दिवे खरेदी करण्यात आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.