आता पत्नीलाही पगार?

तमाम ‘हाऊसवाईफ’साठी एक खुशखबर आहे. आता प्रत्येक पतीला आपल्या उत्पन्नाचा काही भाग आपल्या पत्नीला देणं अनिवार्य होऊ शकतं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 4, 2012, 02:57 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
तमाम ‘हाऊसवाईफ’साठी एक खुशखबर आहे. आता प्रत्येक पतीला आपल्या उत्पन्नाचा काही भाग आपल्या पत्नीला देणं अनिवार्य होऊ शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार आता, गृहिणींनाही काम करणाऱ्या महिलांप्रमाणे घरकामचा मोबदला म्हणून प्रत्येक महिन्याला पगार मिळू शकतो.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं तसा एक प्रस्तावच तयार केलाय. लवकरच हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर प्रत्येक पतीला आपल्या पत्नीला घरकामाचा मोबदला म्हणून प्रत्येक महिन्याला पगारातील काही भाग द्यावा लागणार आहे, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल विकास राज्यमंत्री कृष्णा तीरथ यांनी दिलीय.
‘सरकार असा एक कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे ज्याद्वारे प्रत्येक पुरुषाला आपल्या उत्पन्नाचा काही भाग आपल्या पत्नीला द्यावा लागणार आहे. यासाठी सरकार एक बेन्चमार्कदेखील तयार करणार आहे. केंद्रीय महिला आयोगानं यासंबंधात तयारी सुरु केलीय. आयोगाच्या माहितीनुसार यासंबंधी मसूदा तयार झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत याचं रुपांत कायद्यात करण्यासाठी हा प्रस्ताव संसदेत सादर करण्याची योजना आहे.’ महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं असं कृष्णा तीरथ यांनी म्हटलंय.