www.24taas.com, झी मीडिया, श्रीनगर
हुरीयतच्या धमकीला भीक न घालता भारतीय वंशाचे जगप्रसिद्ध संगीतकार जुबिन मेहता आज (शनिवारी) काश्मीर खोऱ्यात आपल्या संगीताच्या माध्यमातून शांतीचं आवाहन केलं.
‘मी काश्मीरला नाही तर काश्मीरनं मला निवडलंय. मला लोकांचा नक्कीच आशिर्वाद मिळेल कारण मला फक्त संगीताचीच भाषा माहीत आहे आणि याच माध्यमातून मी शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे’ असं जुबिन मेहता यांनी म्हटलंय.
दाल लेकच्या तटावर होणाऱ्या या कार्यक्रमावर वादंग उभा राहिला होता. जुबिन यांच्या कॉन्सर्टला विरोध करणाऱ्या विरोधकांची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही निंदा केलीय. मेहता यांच्या कार्यक्रमासाठी श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा तैनात करण्यात आलीय. मोजक्याच १५०० दर्शकांसमोर जुबिन मेहता आपला कार्यक्रम सादर केला. जर्मनीचे भारतातील राजदूत मायकल स्टेनर यांनी ‘एहसास-ए-काश्मीर’ या ९० मिनिटांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. हा कार्यक्रम १०४ देशांमध्ये ‘लाईव्ह’ प्रदर्शित होतोय.
जुबिन मेहता यांचा जन्म मुंबईचा.. त्यांना संगीताचे पहिले धडे आपल्या वडिलांकडून - मेहली मेहता यांच्याकडून मिळाले. मेहली हे ‘बॉम्बे सिंफनी ऑर्केस्ट्रा’चे संस्थापक होते. जुबिन मेहता हे सध्या दिल्लीमध्ये ‘टागोर अवॉर्ड फॉर कल्चरल हार्मनी’चा स्वीकार करण्यासाठी आले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्लीमध्ये झालेल्या एका खास कार्यक्रमात हा पुरस्कार जुबिन यांना प्रदान केला.
भारतीय वंशाच्या या वेस्टर्न क्लासिकल संगीतकारानं सध्या तरी शालीमार बाग गार्डनमध्ये होणाऱ्या आपल्या कार्यक्रमावर झालेल्या वादाबद्दल बोलण्यास नकार दिलाय. दुसरीकरडे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीरसाठी हा बहुमान असल्याचं म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.