मुंबई : गुजरातमध्ये पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली आणि मुंब्य्रात राहणारी इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आत्मघातकी हल्लेखोर होती, अशी कबुली हेडलीनं दिलीय. त्यानंतर भाजपनं विरोधी पक्ष आणि इशरत जहाँच्या समर्थकांवर हल्लाबोल केलाय.
हे सत्य अगोदरपासूनच सगळ्यांना माहीत होतं, पण आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. केवळ राजकीय फायद्यासाठी या मुद्याचं राजकारण करण्यात आलं होतं. मात्र, आता या लोकांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केलीय. राहुल आणि सोनिया गांधी यांनीदेखील भाजपची माफी मागावी, असंही त्यांनी म्हटलंय.
गुजरातमध्ये १५ जून २००४ रोजी इशरत एका एन्काऊन्टरमध्ये ठार झाली होती. यानंतर देशभरात याविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. विरोधी पक्षांनीही तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली होती. हे एन्काऊन्टर फेक असल्याचं सांगितलं जात होतं.
उल्लेखनीय म्हणजे, इशरत निर्दोष असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. पण, आता मात्र त्यांची गोची झालीय.
हेडलीच्या जबाबानंतर जेव्हा इशरतवर आत्ता आव्हाड यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांना काय बोलावं तेच सुचेना... तरिही त्यांनी बचावात्मक भूमिका घेत 'हेडलीनं नेमकं काय म्हटलंय हे मला अजून माहीत नाही... मला या प्रकरणाचा अभ्यास करावा लागेल' असं म्हणत वेळ मारून नेलीय.