अहमदाबाद : गुजरात राज्यातील राजकोट येथे लग्न करण्याच्या बहाण्याने एका पन्नास वर्षीय व्यक्तीला चक्क तीन महिलांनी लुटले. याप्रकरणी तीन महिलांसह एकाला अटक करण्यात आलेय.
याप्रकरणी मंजुळा ऊर्फ मोना वाघेला(३३), दैसी माकवान (४५), शीला ख्रिश्चियन (५४) आणि मायकेल जोसेफ (२५) यांना अटक करण्यात आली आहे. आपल्याला लुटले असल्याची तक्रार परसोतम मारविया (राजकोट) यांनी पोलिसांत केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पुरसोतम यांच्या पत्नीचे साडेतीन वर्षांपूर्वी निधन झाले. परसोतम यांना पाच मुली आणि दोन मुले आहेत. परसोतम यांना त्यांच्या मुलांनी दुसरा विवाह करण्याचा सल्ला दिला होता. कुटुंबीयांनी शिलाशी संपर्क साधून वधू शोधण्यास सांगितले होते. दरम्यान, मंजुळाने परसोतम यांना दूरध्वनी करून विवाहास इच्छुक असल्याचे सांगितले.
माझे प्रेम आहे. तुम्ही नकार दिला तर मी आत्महत्या करीन तशी चिठ्ठी ठेवीन असे सांगितले. अहमदाबाद येथे मला भेटायला या, असे सांगून बोलावून घेतले. हॉटेलवर परसोतम यांना भेटण्याची वेळ दिली. हॉटेलमध्ये त्यांना पाणी पिण्यास दिल्यानंतर ते बेशुद्ध पडले. परसोतम यांना जाग आल्यानंतर त्यांच्याकडील पैसे, सोन्याचे दागिने घेऊन मंजुळा फरार झाली.
दरम्यान, या घटनेनंतर एका व्यक्तीने परसोतम यांच्याशी संपर्क साधला. एका महिलेसोबत तुमची अश्लील फोटो असून २५ लाख रुपयांची मागणी केली. प्रथम पाच लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पोलिसांना सांगून सापळा रचण्यात आलाय. पोलिसांनी पैसे घेताना त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सोने, पैसे आणि मोटार जस्त करण्यात आली.