www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या चंदन कुमार सिंह यानं कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह तर केला. पण, केवळ पत्नीनं फेसबुकवर लग्नाचे फोटो अपलोड केल्यानंतर, बदनामी होईल या भीतीनं धास्तावलेल्या या तरुणानं आपलं जीवन संपवलंय.
`एमएनसी`मध्ये काम करणा-या एका सॉफ्टवेयर इंजिनीअर चंदन कुमार सिंह यानं संध्या या कॅथलिक तरुणीबरोबर विवाह केला. आई-वडिलांचा होणारा विरोध धुडकावत त्यानं संध्याशी लग्नाच्यावेळी चर्चमध्ये आयुष्यभर साथ निभावण्याच्या आणाभाका घेतल्या. संध्याचा केवळ धर्म वेगळा म्हणून चंदनच्या आई-वडीलांनी या लग्नाला विरोध दर्शविला होता. चंदननं संध्याबरोबर वेगळा संसार थाटल्यानंतर लोकांना ही गोष्ट कळू नये, याची खबरदारी आई-वडील घेत होते... बदनामीची भीती त्यांना सतावत होती... त्यामुळे लग्नानंतरही सत्य न स्वीकारता त्यांनी आपला मुलगा परदेशात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं होतं.
पण, आपलं अस्तित्वच नाकारलं जात असल्याची बोच संध्याला लागली होती. तीनं आपल्या लग्नाचे फोटो फेसबुकवर अपलोड करून चंदनला त्यात टॅग केलं. यामुळे चंदनच्या नातेवाईकांकडून आई-वडीलांना चंदनबद्दल विचारपूस होऊ लागली. याचा जाब विचारत, आई-वडीलांनी चंदनला हे फोटो फेसबुकवरून काढून टाकण्यास सांगितलं. चंदननं संध्याला हे फोटो फेसबुकवरून काढण्यास सांगितले तेव्हा या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि दोघंही वेगवेगळ्या रुममध्ये झोपण्यासाठी निघून गेले. रविवारी सकाळी चंदन खोलीबाहेर आला नाही म्हणून संध्या त्याच्या खोलीत गेली तेव्हा तीनं चंदनला गळफास लावलेल्या अवस्थेत पाहिलं.
पोलीस तपासात सापडलेल्या चिठ्ठीत `माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही. मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो. पण तिनं फेसबुक पोस्ट काढून न टाकल्याने मी नाराज आहे` असं लिहिलेलं आढळलं. यानंतर पोलिसांनी चंदनचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.