मुंबई : मुस्लिम कट्टरवादी दहशतवादी संघटना 'लष्कर ए तोयबा'चा ९/११ सारखा विमान इमारतीत घुसवून हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक राजपथावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सोहळ्यादरम्यान कानाकोपऱ्यात कडक पहारा देण्यासाठी राजधानी दिल्लीत हजारोंच्या संख्येने दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर कोणत्याही प्रकारच्या संभाव्य हवाई हल्ल्याचा कट उधळून लावण्याची विशेष तयारी करण्यात आली आहे.
मध्य आणि नवी दिल्ली परिसरात दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवळपास ५० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. कानाकोपऱ्यात त्यांची करडी नजर असणार आहे.
प्रजासत्ताक दिनी लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनांकडून दिल्लीवर हवाई हल्ले होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्याची गंभीर दखल घेत दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
कोणत्याही प्रकारचा हवाई हल्ल्याचा कट उधळून लावण्यासाठी अथवा अवकाशात उडणाऱ्या संशयित वस्तूचा माग लावण्यासाठी पोलीस ‘अॅण्टी ड्रोन’ तंत्राचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.